मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मे २०२४
मुंबई, – शहरात तीन अपघातात एका वयोवृद्धासह तरुणाचा मृत्यू झाला. दोन्ही अपघात दहिसर आणि विक्रोळी परिसरात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये मीत सुरेश चितरोडा (२१), इरफान नवाबअली शेख (३२) आणि ईश्वर गणपत सुरडकर (६५) यांचा समावेश आहे. याप्रकरणी विक्रोळी, जे. जे मार्ग आणि दहिसर पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे.
पहिला अपघात गुरुवारी २३ मेला सकाळी सव्वासात वाजता भायखळा येथील माझगाव, नेसबीट ब्रिजवर झाला. इरफान हा माझगाव परिसरात राहत असून तो गुरुवारी सकाळी त्याच्या बाईकवरुन नेटसीट ब्रिजवरुन जात होता. यावेळी समोरुन येणार्या एका पंधरा वर्षांच्या बाईकस्वाराने त्याच्या बाईकला जोरात धडक दिली. या अपघातात ते दोघेही जखमी झाल्याने त्यांना तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे इरफानला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी झालेल्या मुलाला प्राथमिक औषधोपचारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्यासह त्याच्या वडिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर मुलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन मुलाला बाईक दिल्याप्रकरणी, याच बाईकने एका बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याने अपघाताला ते जबाबदार असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
दुसरा अपघात दहिसर येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ओवरीपाडा रेल्वे स्टेशनजवळील उत्तर वाहिनीवर झाला. मीत चितरोडा हा मालाड येथील ओंकार एसआरए अपार्टमेंटमध्ये राहतो. सोमवारी २० मेला सकाळी सव्वादहा वाजता मीत हा त्याची मैत्रिण गौरीसोबत त्याच्या बाईकवरुन जात होता. ही बाईक ओवरीपाडा मेट्रो स्टेशनजवळ येताच त्याचा बाईकवरील तोल गेला आणि बाईक स्लीप झाली होती. अपघातात मीतसह गौरी हे दोघेही जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे मीतला डॉक्टरांना मृत घोषित केले तर गौरीला प्राथमिक औषधोपचार करुन सोडून देण्यात आले. तपासात मीत हा भरवेगात बाईक चालवत होता, यावेळी त्याचा बाईकवरील तोल गेला आणि त्याने रस्त्याच्या डिवायडरला जोरात धडक दिली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस शिपाई पंडीत मनोहर राठोड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मीतविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्या मृत्यूस तर मैत्रिणीला जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.
तिसर्या दुसर्या अपघातात ईश्वर गणपत सुरडकर या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. गेल्या तीन वर्षांपासून ईश्वर दिसत नव्हते. अनेकदा ते बाहेर गेल्यानंतर घरी येताना वाट चुकत होते. गेल्या वर्षी ते कसारा येथे गेले होते. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या खिशात मोबाईल क्रमांक असलेला पेपर ठेवल्याने त्यांना कसारा येथून घरी आणण्यात आले होते. शनिवारी १८ मेला ते विक्रोळीतील पूर्व ईस्टर्न हायवे, नारायण बोंधे ब्रिजजवळ पायी चालत जात होते. यावेळी एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक तेथून पळून गेला होता. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन चालकाचा शोध सुरु केला आहे.