फसवणुकीची ३९ लाखांची गोठविण्यात सायबर सेल पोलिसांना यश
फसवणुकीची रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा होणार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मे २०२४
मुंबई, – पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याने गुन्हा दाखल झाला आहे, याच गुन्ह्यांत कारवाईची धमकी देऊन अज्ञात सायबर ठगाने एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याची ३८ लाख ८८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली. याप्रकरणी फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच सायबर सेल पोलिसांनी बँकेच्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून संबंधित बँक खात्यातील रक्कम गोठविण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे गोठविण्यात आलेली ही रक्कम लवकरच तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सायबर पोलीस पोर्टलसह सायबर सेल पोलिसांच्या प्रयत्नामुळे ही रक्कम परत मिळाल्याने तक्रारदाराने संबंधित पोलीस पथकाचे आभार व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसांत पार्सलमध्ये बोगस पासपोर्ट, ड्रग्ज आणि चलन सापडले असल्याचे कुरिअर कंपनीकडून कॉल केले जात असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, ड्रग्ज तस्करीसह मनी लॉड्रिंगप्रकरणात कारवाईची होण्याची भीती घालून फसवणुक केली जात होती. काही दिवसांपूर्वी अंधेरी येथे राहणार्या तक्रारदारांची अशाच प्रकारे अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केली होती. तक्रारदार एका खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहेत. त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने एक पार्सल आले असून ते पार्सल कस्टम विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यात बोगस पासपोर्ट, ड्रग्जसह इतर आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांची लवकरच मुंबई पोलिसांसह आयकर विभागासह इतर केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी होणार आहे. या गुन्ह्यांत त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल अशी भीती घालून प्रकरण मिटविण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. अटकेच्या भीतीने त्यांनी संबंधित व्यक्तीच्या सांगण्यावरुन बँक खात्यात ३८ लाख ८८ हजार रुपये पाठविले होते. मात्र ही रक्कम पाठवूनही त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी होत होती.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव नलावडे यांनी गंभीर दखल घेत पश्चिम प्रादेशिक सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस हवालदार महेश मोहिते, पोलीस शिपाई किरण पाटील यांनी तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढून या पथकाने एनसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल करुन संबंधित बँकेच्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधला होता. त्यानंतर या अधिकार्यांच्या मदतीने संबंधित बँक खात्याची रक्कम गोठविण्यात आली होती. ही रक्कम आता तक्रारदाराच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार आहे.
अशा गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल
नामांकित कुरिअर कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून आपले बँक खात्यातून नियमित व्यवहार झाल्याचे, आपले नाव ड्रग्ज, हत्यारे, हवाला व्यवहारात झाल्याचे सांगून येणारे कॉल हाताळताना सावधानता बाळगावी.
पोलीस, आयकर अधिकारी तसेच इतर केंद्रीय तपास अधिकारी असल्याची बतावणी करुन सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळखपत्र, नोटीस पाठवून आपल्याला अटक होईल अशी भीती दाखवून पैशांची मागणी झाल्यास त्याची योग्य ती शहानिशा करावी. प्रसंगी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
संभ्रमित होऊन कोणतेही आर्थिक व्यवहार करु नका. अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती सांगू नका किंवा कुठल्याही बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करु नका.
आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ सायबर हेल्पलाईल क्रमांक १९३० वर संपर्क साधावा.