मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मे २०२४
मुंबई, – केवायसी अपडेटच्या नावाने एका पोलीस शिपायाची फसवणुक झाल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. बँकेची बोगस वेबपेज पाठवून अज्ञात सायबर ठगाने पोलीस शिपायाला ३६ हजार ८४० रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी एक वर्षांनी जुहू पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
चेतन मल्लिकार्जुन चाबूकस्वार हे वांद्रे येथील वॉटरफिल्टर रोड, वांद्रे पोलीस वसाहतीत राहत असून सध्या वर्सोवा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. १ मार्च २०२३ रोजी ते विलेपार्ले येथील जुहू-तारा रोडवर कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठविला होता. त्यात त्यांची नेट बँकिंग सेवा आज बंद होणार आहे. तुमचे पॅनकार्ड अपडेट झाले नसून ते तातडीने अपडेट करावे असे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी मॅसेजमधील लिंक ओपन केली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांच्या बँकेचे वेबपेज ओपन झाले होते. ती बँकेची अधिक वेबपेज असल्याचे समजून त्यांनी त्यांची माहिती अपलोड केली होती. ही माहिती दिल्यानंतर काही वेळात त्यांच्या बँक खात्यातून ३६ हजार ८४० रुपये डेबीट झाले होते. केवायसी अपडेटच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बोगस मॅसेजसह बँकेची लिंक पाठवून त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी जुहू पोलिसांत तक्रार केली होती. एक वर्षांनी त्यांच्या तक्रार अर्जावरुन जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. केवायसी अपडेटसाठी बँकेतून कधीही कॉल केला जात नाही याबाबत पोलिसांकडून जनजागृती केली जाते, तरीही अशा प्रकारच्या फसवणुकीला पोलीस बळी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.