मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मे २०२४
मुंबई, – कोकेन तस्करीप्रकरणी एका नायजेरीयन नागरिकाला वरळी युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. ख्रिस्तोफर अबसिरील असे या नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी ८० लाख रुपयांचा दोनशे ग्रॅम वजनाचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएससह विदेशी नागरिक कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागपाडा येथील मदनपुरा परिसरात काही विदेशी नागरिक कोकेन या ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी सायंकाळी तिथे ख्रिस्तोफर अबसिरील हा आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना २०० ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे ८० लाख रुपये आहे. तपासात ख्रिस्तोफर हा मूळचा नायजेरीयन नागरिक असून गेल्या काही वर्षांपासून तो भारतात वास्तव्यास होता. झटपट पैशांसाठी तो ड्रग्ज तस्करीच्या व्यवसायात सामिल झाला होता. सध्या तो वाशी येथे राहत असून त्याला ते कोकेन त्याच्या एका मित्राने दिले होते. त्यानंतर कोकेनची डिलीव्हरीसाठी तो नागपाडा परिसरात आला होता. मात्र डिलीव्हरीपूर्वीच त्याला या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस आणि विदेशी नागरिक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी दुपारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कदम हे करत आहेत.