प्रेमसंबंधाला अडसर असलेल्या दिड वर्षांच्या मुलाची हत्या
जोगेश्वरीतील घटना; जन्मदात्या मातेसह दुसर्या पतीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मे २०२४
मुंबई, – प्रेमसंबंधाला अडसर असलेल्या स्वतच्या दिड वर्षांच्या अमानुषपणे लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोरेगाव येथील नाल्यात फेंकून दिल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. या मुलाचे दोन अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा बनाव करुन आरोपीने मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती, मात्र ही तक्रार करणे त्यांच्याच अंगलट आली. सीसीटिव्ही फुटेजमध्ये असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे उघड होताच आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर या हत्येच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. याच गुन्ह्यानंतर जन्मदात्या माता रिंकी राजेश राणा आणि तिचा दुसरा पती राजेश चैतन्य राणा या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांनीच मुलाची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजेश हा मूळचा ओरिसाच्या कमसरा, तलगजचा रहिवाशी असून सध्या तो जोगेश्वरीतील प्रेम गोपाल कॉम्प्लेक्स, ऑल केअर हॉस्टिपलसमोर त्याची पत्नी रिंकी आणि दिड वर्षांचा सावत्र मुलगा अजान (नावात बदल) यांच्यासोबत राहत होता. राजेश हा तिथेच कडीमा काम करत होता. शनिवारी १८ मेला त्याच्या मेहुण्याचे निधन झाल्याने तो दोन दिवस कामावर गेला नव्हता. त्यातच मंगळवारी २१ मेला रिंकीची प्रकृती ठिक नसल्याने तो तिचे औषध आणि भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये गेला होता. यावेळी त्याच्यासोबत अजान हादेखील होता. रिक्षातून प्रवास करताना त्याला परफ्युमसारखा सुगंध आल्याने तो काही वेळानंतर बेशुद्ध झाला. ही संधी साधून रिक्षाचालकासह त्याच्या सहकार्याने अजानचे अपहरण केले होते. रात्री दहा वाजता शुद्ध आल्यानंतर त्याने अजानचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याला अजान कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्याने मेघवाडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अजानचे अपहरण झाल्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. राजेशने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजची पाहणी केल्यानंतर असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेत राजेशची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंछर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घाडगे, आनंद भगत, पोलीस उपनिरीक्षक वर्षा ठुले, पोलीस हवालदार माने, पोलीस शिपाई ठाकूर, शेख, वरठा यांनी राजेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत तो विसंगत माहिती देत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवून बोलते केले. चौकशीत त्याने २१ मेला अजान हा सायंकाळी साडेपाच वाजता खेळण्यसाठी बाहेर गेला होता. तो जिन्यावरुन खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्यांना काहीच सुचत नव्हते. त्यामुळे राजेश आणि रिंकी हे प्रचंड घाबरले. यावेळी त्यांनी त्याचा मृतदेह गोरेगाव येथील आरे कॉलनी, शिवधाम हिंदू स्मशानभूमीजवळील नाल्यात टाकल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त होताच अजानचा मृत्यू नैसगिक नसून त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाण केल्याच्या तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे राजेशची पोलिसांनी पुन्हा चौकशी केली असता त्यानेच त्याची पत्नी रिंकी म्हणजे अजानची आई रिंकीच्या मदतीने अजानची लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या करुन त्याचा हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह नाल्यात फेंकून पलायन केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर रिंकीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
रिंकीच्या चौकशीत अजान हा तिच्या पहिल्या पतीचा मुलगा होता. या मुलाचा राजेशला प्रचंड राग होता. त्यांच्या प्रेमसंबंधात तो मोठा अडसर होता. त्यामुळे या दोघांनीच त्याची लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन हत्या केली होती. हत्येचा पुरावा नष्ट करुन राजेश पोलीस ठाण्यात आला आणि त्याने त्याच्या दिड वर्षांच्या मुलाचे दोघांनी अपहरण केल्याची खोटी तक्रार केली. मात्र ही तक्रार करणे त्याच्या अंगलट आली, सीसीटिव्ही फुटेजमध्ये असा कुठलाही प्रकार घडल्याचे उघडकीस आले आणि या हत्येचा पर्दाफाश झाला. हा प्रकार उघडकीस येताच या दोघांविरुद्ध पोलिसांनी ३०२, २०१, १८२, ३६३, १२० ब, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. कुठलाही पुरावा नसताना अवघ्या काही तासांत मेघवाडी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करुन अपहरणासह हत्येच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आणि दोन्ही आरोपींना शिताफीने अटक केली. या कामगिरीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंछर यांच्यासह त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घाडगे, आनंद भगत, पोलीस उपनिरीक्षक वर्षा ठुले, पोलीस हवालदार माने, पोलीस शिपाई ठाकूर, शेख, वरठा यांचे कौतुक केले.