२० बांगलादेशी नागरिकांना कारावासासह दंडाची शिक्षा
कोलकाता, नालासोपारा, विरार व पुण्यात अनधिकृतपणे वास्तव्य
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मे २०२४
मुंबई, – बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून कोलकाता येथून नालासोपारा, विरार आणि पुण्यात वास्तव्य करुन बोगस भारतीय दस्तावेज बनविल्याचा आरोप असलेल्या वीस बांगलादेशी नागरिकांना किल्ला कोर्टाने दोषी ठरवून आठ महिन्यांचा कारावासासह चार हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना आणखीन सोळा दिवस कारावास भोगावा लागणार आहे. अवघ्या सात महिन्यांत या खटल्याचा निकाल लागला असून शिक्षा भोगून झाल्यानंतर सर्व बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत बोरिवलीतील एल. टी मार्ग, आकाश स्विटसमोर काहीजण काही बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर बोरिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या सुमन मोमीन सरदार ऊर्फ विश्वजीत बाटुला मंडल, ओमर फारुख मौल्ला ऊर्फ नासीर शहाजहानउद्दीन आणि सलमान आयुब खान ऊर्फ अब्दुल सलाम आयुब मंडल या तीन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली होती. ते तिघेही बांगलादेशी नागरिक होते, तरीही त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्डसह इतर बोगस दस्तावेज सापडले होते. चौकशीदरम्यान सुमन आणि आयुब हे दोघेही एजंट म्हणून काम करत असून भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना ते दोघेही बोगस दस्तावेज बनवून देत होते. या दस्तावेजाच्या मदतीने त्यांनी अनेकांना बोगस भारतीय पासपोर्ट मिळवून दिले होते. या तिघांच्या चौकशीनंतर या पथकाने नालासोपारा, विरार आणि पुण्यात छापेमारी केली होती. या कारवाईत पोलिसांत इतर सतरा बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यात अतिकुल अकिलउद्दीन मुल्ला, मुस्ताकअली कुतुबुद्दीन तरबदार, फिरोज फलउक मोल्ला, रहिम मोईद्दीन मंडल ऊर्फ रहिमउद्दीन मुल्ला, रॉनी शफीकुल शेख ऊर्फ रशीदउल इस्माम मोनीर होलदार, इनामुलकमल सरदार, मसुद राणा इंद्रीस गाझी, रिपो रोमेन ढाली, मोनीरुल मोहम्मद मुल्ला, आरिफ शौकत विश्वास, ममुमबिल्ला अश्रफ मंडल, दिलावर गाझी आणि रब्बी कजल मंडल यांचा समावेश होता.
गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बांगलादेशातून काही बांगलादेशी अनधिकृतपणे भारतात प्रवेश करुन कोलकाता, पुणे, विरार आणि नालासोपारा येथे राहत होते. बांगलादेशातील उपासमारीसह बेरोजगार कंटाळून ते सर्वजण बांगलादेशातून कोलकाता आणि नंतर पुणे, नालासोपारा आणि विरार येथे राहण्यासाठी आले होते. तिथे लहानसहान काम केल्यानंतर या बांगलादेशी नागरिकांना त्यांच्याच सहकारी एजंटने बोगस आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर भारतीय दस्तावेज बनवून दिले होते. या दस्तावेजाच्या मदतीने त्यांनी भारतीय पासपोर्ट मिळविले होते. या पासपोर्टवर व्हिसा मिळवून त्यातील काही बांगलादेशी नागरिक आखाती देशात नोकरीसाठी जाणार होते. मात्र त्यापूर्वीच या वीस बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. या आरोपीविरुद्ध नंतर किल्ला कोर्टात एक हजार पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्याची नियमित सुनावणी न्या. झनवट यांच्या कोर्टात सुरु होती. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली. शुक्रवारी २४ मेला न्या. झनवट यांनी वीस बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरवून त्यांना आठ महिन्यांचा कारावास, प्रत्येकी चार हजार रुपयांचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन सोळा दिवस कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेनंतर या सर्वांना त्यांना त्यांच्यात देशात पाठविण्यात येणार आहे.
ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्क्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर, कल्याण पाटील, पोलीस हवालदार शेख, राणे, सावर्डेकर, पोलीस शिपाई केसरे, रेवाळे, गर्जे यांनी केली तर पोलीस हवालदार प्रमोद जाधव, कणसे यांनी न्यायालयीन कामात महत्त्वाची कामगिरी बजाविली होती.