ऑडिओ टोन कंपनीच्या बोगस ऍम्पिफायरसह इतर वस्तूंची विक्री
सव्वाकोटीच्या बोगस मुद्देमाल, कॅशसहीत दोघांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मे २०२४
मुंबई, – ऑडिओ टोन कंपनीच्या बोगस ऍम्पिफायरसह इतर वस्तूंची विक्री करुन कंपनीसह ग्राहकांची फसवणुक करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन व्यापार्यांविरुद्ध भादवीसह कॉपी राईट कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६६ लाख ३२ हजार रुपयांचा ऍम्पिफायरसह इतर साहित्य आणि ५५ लाख ८६ हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. रिझवान इस्माईल लकडावाला आणि मोहम्मद जिकरिया मोहम्मद याहिया अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सागितले.
दक्षिण मुंबईतील काही दुकानात स्वामीत्व हक्कांचे उल्लघंन करुन ऑडिओ टोन कंपनीच्या ऍम्पिफायरसह इतर वस्तूंची सर्रासपणे विक्री होत आहे. अशा प्रकारे बोगस ऍम्पिफायरसह इतर वस्तूंची विक्री करुन काही व्यापार्याकडून कंपनीसह ग्राहकांची फसवणुक होत असल्याची तक्रार कंपनीच्या वतीने गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी कंपनीच्या अधिकार्यांच्या मदतीने चर्नीरोड येथील दुकानात छापा टाकला होता. यावेळी तिथे कंपनीच्या बोगस ऍम्पिफायरसह इतर वस्तूंची विक्री होत असल्याचे उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांत पोलिसांनी रिझवान लकडावाला आणि मोहम्मद जिकरिया याहिया या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या दुकानातून पोलिसांनी सुमारे सव्वाकोटीचा कॅशसहीत बोगस वस्तूंचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या वतीने मुकेश माल यांच्या तक्रारीवरुन चर्नीरोड पोलिसांनी रिझवान आणि मोहम्मद जिकरिया यांच्याविरुद्ध ४२०, ४८२, ४८८ भादवी सहकलम ५१, ६३, ६८ कॉपी राईट ऍक्ट सहकलम १०२, १०३ ट्रेडमार्क कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. अटकेनंतर या दोघांनाही शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांनी हा माल कोठून आणला, त्यांना तो कोणी दिला, ते कधीपासून कंपनीच्या बोगस वस्तूंची विक्री करत होते. या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, मुंबई शहरात इतर कुठल्या दुकानात अशा बोगस ऍम्लिफायरसह इतर वस्तूंची विक्री होते याचा याचा पोलीस तपास आहे.