मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मे २०२४
मुंबई, – विश्वासाने बँक व्यवहाराची जबाबदारी सोपविलेल्या एका व्यावसायिकाने त्याच्याच परिचित वयोवृद्ध डॉक्टरसह मुलाच्या बँक खात्यातून ४२ लाख ५० हजार रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वयोवृद्ध डॉक्टरच्या तक्रारीवरुन संजय दत्ताराम साटम या आरोपी व्यावसायिकाविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. लवकरच आरोपीची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
९८ वर्षांचे वयोवृद्ध गोपाळ महादेव धडफळे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. ते त्यांचा मुलगा केदार याच्यासोबत दादरच्या दादासाहेब फाळके रोड, नवीन आशा अपार्टमेंटमध्ये राहत असून तिथे त्यांच्या मालकीचे दोन फ्लॅट आहेत. त्यांना एएमएडी हा डोळ्यांचा आजार असून दोन्ही डोळ्यांनी त्यांना व्यवस्थित दिसत नाही. त्यांचा पॅथोलॉजिस्टिचा व्यवसाय असनू ते ओझोन आणि सेलेशन थेरेपीचा उपचार करतात. या क्षेत्रातील ते अनुभवी डॉक्टर म्हणून परिचित असून त्यांच्याकडे अनेक पेशंट थेरेपीसाठी येतात. ते साटम महाराजांचे भक्त असून त्यांना गुरु मानतात. त्यांच्यावर त्यांची प्रचंड श्रद्धा असून त्यांच्या पादुका आणि दत्तमंदिर त्यांच्या क्लिनिकपासून काही अंतरावर आहे. काही वर्षांपूर्वी लायन्स क्लबतर्फे कोकणात एक मेडीकल कॅम्प भरविण्यात आले होते. तिथेच त्यांची संजय साटमशी पहिल्यांदा ओळख झाली होती. त्याने तो साटम महाराजांचा पणतू असल्याचे सांगून त्याच्याकडे दैवी शक्ती आहे. त्याने ऑक्सफर्ड युनिव्हरसिटीमधून पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले असून तो आंतरराष्ट्रीय वकिल आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याचे एक खाजगी चेंबर असून त्याच्या हाताखाली अनेक वकिल कामाला आहेत असे सांगितले होते.
तो फ्रान्स दूतावासात सभासद होता, गोवा गर्व्हनरच्या लिस्टमध्ये त्याचे नावे होते. पूर्वी त्याची भारत सरकारने पोर्तुगालला जाण्यासाठी कॉन्सुलेट मेंबर म्हणून नियुक्ती केली होती. आयलँडचे पंतप्रधान वराडकर हे त्याचे मावस भाऊ आहेत असे मोठमोठ्या थापा मारुन त्याचे वरिष्ठ पातळीवर चांगल्या ओळखी असल्याचे सांगितले होते. काही महिन्यानंतर तो प्रकृतीचे कारण सांगून त्यांच्या घरी येत होता. त्यांना पैसे न देता ओझोन आणि सेलेशन थेरेपी करत होता. याच दरम्यान त्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची माहिती काढून घेतली होती. त्यांचा विश्वास संपादन त्याने त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान त्याला त्यांच्यासह त्यांच्या भावामध्ये पुण्याच्या मिळकतीवरुन वाद आणि केस सुरु असल्याची माहिती समजली होती. यावेळी त्याने त्याची पोलीस खात्यासह केंद्रातील मोठ्या आयएएस अधिकार्यांशी चांगले संबंध असल्याचे सांगून त्यांच्या प्रॉपटीचे प्रकरण मिटवून टाकण्याचे तसेच सर्व प्रॉपटी त्यांच्या नावावर करुन देण्याचे आश्वासन दिले होते. गोपाळ धडफळे हे वयोवृद्ध होते, त्यांना डोळ्यांचा आजार होता. त्यांच्या दोन मुलांना डिप्रेशनचा त्रास होता. हीच संधी साधून त्याने त्यांच्या बँकेचे सर्व व्यवहार स्वतकडे घेतले होते. त्यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या बँक व्यवहाराची जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती.
जानेवारी २०२२ ते मे २०२४ या कालावधीत त्याने त्यांच्या बँक खात्यातून २९ लाख ५० हजार तर त्यांच्या मुलाच्या बँक खात्यातून १३ लाख रुपये त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. हा प्रकार गोपाळ धडफळे यांच्या निदर्शनास आला होता. बँक स्टेटमेंट पाहिल्यानंतर ४२ लाख ५० हजाराची ही रक्कम संजय साटमने स्वतच्या दोन बँक खात्यात ट्रान्स्फर केल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने आर्थिक अडचणीमुळे ही रक्कम घेतल्याची कबुली दिली. तसेच त्यांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांचे पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी संजय साटमविरुद्ध भोईवाडा पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संजय हा व्यावसायिक असून तो सध्या वांद्रे येथील रिबेलो रोड, ब्ल्यू हेवन अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्याची जबानी नोंदवून पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.