मद्यप्राशन करुन पोलिसांशी हुज्जत घालणे महागात पडले
शिवीगाळ-धक्काबुक्की करुन धमकी देणार्या तरुणाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मे २०२४
मुंबई, – ऑल आऊट ऑपेशनदरम्यान कर्तव्य बजाविणार्या पोलीस पथकाला शिवीगाळ, धक्काबुक्की करुन धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिद्धांत दिलीप शेजवळ या ३० वर्षांच्या मद्यपी तरुणाला सहार पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. मद्यप्राशन करुन पोलिसांशी हुज्जत घालणे सिद्धांत चांगलेच महागात पडले आहे.
किरण श्रीमंत कोळी हे सांताक्रुज येथील पोलीस अधिकारी वसाहतीत राहत असून सध्या सहार पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री मुंबई शहरात ऑल आऊट ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ते त्यांच्या सहकारी पोलीस हवालदार खापने, पोलीस शिपाई बहिराम, महिला पोलीस शिपाई जाधव, मसुब, पिंजारी, मुसुब, गोपनार आणि बीट मार्शल पोलीस शिपाई केंद्रे, पश्चिम प्रादेशिक विभागाच्या राखीव दहा वाहन, पाच पोलीस अंमलदार आणि महिला अंमलदारासोबत अंधेरीतील अंधेरी-कुर्ला रोड, लेलेवाडी जंक्शन परिसरात कर्तव्य बजावत होते. रात्री साडेबारा वाजता सिद्धांत शेजवळ हा त्याच्या बाईकवरुन साकिनाका येथून अंधेरीच्या दिशेने येत होता. यावेळी त्याला नाकाबंदी करणार्या पोलीस पथकाने थांबविले. यावेळी तिथे उपस्थित वाहतूक पोलिसांनी त्याला बे्रथ ऍनलाईझरमार्फत तपासणी करण्याबाबत सांगितले असता त्याने तपासणी करण्यास नकार दिला. तसेच पोलिसांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी उद्धट वर्तन करुन त्याने त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला पोलिसांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली होती. त्याला ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना त्याने पोलिसांना उद्देशून तुम्ही मला गाडीमध्ये घातले आहे, त्याचे परिणाम तुम्हाला उद्या भोगावे लागतील अशी धमकी दिली होती.
काही वेळानंतर त्याने किरण कोळी यांच्या शर्टाची कॉलर पकडून खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या वर्दीचे तीन बटन तुटले. धक्काबुक्कीसह शिवीगाळ करुन त्याने पुन्हा पोलिसांना धमकी देण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करुन त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान त्याचे नाव सिद्धांत शेजवळ असल्याचे समजले. तो अंधेरीतील वर्सोवा लिंक रोड, कपासवाडी, लोकनायक नगरचा रहिवाशी आहे. तपासात त्याने मद्यप्राशन केले होते. मद्यप्राशन अवस्थेत असताना बाईक चालवून कर्तव्य बजाविणार्या पोलिसांशी हुज्जत घालणे, त्यांना शिवीगाळ करुन धमकी देणे तसेच सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.