विदेशी सिगारेटची तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

साडेआठ कोटीच्या सिगारेटसह दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मे २०२४
मुंबई, – विदेशातून कोट्यवधी रुपयांचे सिगारेटची तस्करी करणार्‍या एका टोळीचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने पर्दाफाफश केला. या गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीसह त्याच्या सहकार्‍याला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून या अधिकार्‍यांनी मुंबईसह नवी मुंबईतून सुमारे साडेआठ कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे. सिगारेट तस्करी करणारी ही सराईत टोळी असल्याचे बोलले जाते. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबईसह देशातील काही प्रमुख शहरात विदेशी सिगारेट तस्करी करणार्‍या काही टोळ्या कार्यरत आहेत. यापूर्वीही या अधिकार्‍यांनी अशाच प्रकारे दोन टोळ्यांचा पर्दाफाश करुन त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा सिगारेटचा साठा जप्त केला होता. या कारवाईनंतर काहीजण विदेशात मोठ्या प्रमाणात सिगारेट आणून त्याची देशभरातील विविध शहरात विक्री करत असल्याची माहिती मुंबई युनिटच्या डीआरआयच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर संबंधित अधिकार्‍यांनी या टोळीची माहिती काढून आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना या अधिकार्‍यांनी मुंबईसह नवी मुंबईत अचानक छापे टाकले होते. या छाप्यात साडेआठ कोटीचे विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला. याच गुन्ह्यांत नंतर दोन आरोपींना या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यातील एक आरोपी या कटातील मुख्य सूत्रधार असून दुसरा त्याचा सहकारी आहे. या दोघांची चौकशी सुरु असून त्यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर सहकार्‍यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. विदेशी सिगारेट तस्करी करणारी एक सराईत टोळी कार्यरत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page