मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मे २०२४
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणुकीवर चांगला परवाता मिळेल अशी बतावणी करुन एका बँक अधिकार्याला सुमारे आठ लाखांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांत शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिनेश ठाकूर सोलंकी हे अंधेरीतील जुहू लेन, सीडी बर्फीवाला रोडवर राहत असून ते एका नामांकित बँकेतील अंधेरी शाखेत रिलेशनशीप मॅनेजर या पदावर काम करतात. मे महिन्यांच्या दुसर्या आठवड्यात त्यांना एका महिलेने कॉल करुन ती मोतीलाल ओसवाल कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. शेअर ट्रेडिंगसंदर्भात विचारणा करुन तिने त्यांना कंपनीच्या शेअर गुंतवणुकीवर त्यांना परतावा मिळेल असे सांगितले होते. याच दरम्यान त्यांना कंपनीची एक जाहिरात सोशल मिडीयावर दिसली होती. त्यामुळे त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीच्या उद्देशाने तिथे संपर्क साधला होता. यावेळी संबंधित व्यक्तीने त्यांना कंपनीच्या मोतीलाल ओसवाल असेट मॅनेजमेंट प्रॅक्ट्रीस नावाच्या एका ग्रुपमध्ये सामिल केले होते. तिथे त्यांना विविध कंपनीच्या शेअरबाबत माहिती देताना त्यात त्यांना किती फायदा होईल याची माहिती दिली जात होती. मोतीलाल ओसवाल कंपनीच्या शेअरमध्ये जास्त फायदा असल्याने त्यांना त्याच कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी कंपनीचे ऍप डाऊनलोन करुन त्यांच्या पत्नीच्या नावाने आठ लाख तेरा हजाराची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीनंतर त्यांच्या खात्यात नफ्याची रक्कम जमा होत होती, त्यामुळे त्याला कंपनीवर विश्वास निर्माण झाले होते. मात्र त्यांना ही रक्कम विड्रॉल करता येत नव्हती. त्यांनी बरेच प्रयत्न केले, मात्र त्यांना पैसे काढता आले नाही. ग्रुपमध्ये विचारणा करुनही समोरुन कोणीच प्रतिसाद देत नव्हते. फसवणुकीचा हा प्रकार उघड होताच त्यांनी सायबर हेल्पलाईन क्रमांकासह एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.