साईटवर येण्यास नकार दिला म्हणून सुरक्षारक्षकावर ब्लेडने हल्ला

माहीम येथील घटना; हल्लेखोर आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मे २०२४
मुंबई, – साईटवर येण्यास नकार दिला म्हणून रागाच्या भरात एका माथेफिरुने विजयप्रकाश लालताप्रसाद दुबे या ४३ वर्षांच्या सुरक्षारक्षकाच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन हल्ला केल्याची घटना माहीम परिसरात घडली. या हल्ल्यात विजयप्रकाश हा गंभीर जखमी झाला होता याप्रकरणी माहीम पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून हल्लेखोर आरोपी रहमत रजाक मोहम्मद शेख याला अटक केली आहे.

ही घटना बुधवारी मध्यरात्री तीन वाजता माहीम येथील महालक्ष्मी इंस्ट्रडीजसमोरील कामगार चाळ, बीएमसी प्लॉटमध्ये घडली. विजयप्रकाश दुबे हा वांद्रे येथे राहत असून माहीमच्या आश्रय योजना सेल या साईटवर गेल्या एक वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. याच साईटवर नूरमोहम्मद शेख हा स्टिल बेंडीगचे काम करतो. त्याचा रहमत हा मुलगा असून त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. अनेकदा तो दारुच्या नशेत साईटवर येऊन तिथे काम करणार्‍या कामगारांना त्रास देत होता. त्यामुळे मॅनेजर कैलास परिहार याने नूरमोहम्मद शेख याला त्याच्या मुलाची समजूत काढून त्याला साईट येऊ नकोस असे सांगितले होते. तसेच रहमत हा साईटवर येऊन कर्मचार्‍यांना त्रास देणार नाही याची खबरदारी घेण्यास विजयप्रकाश यांना सांगितले होते. ही माहिती समजताच त्याने कैलास परिहार यांना फोन करुन त्यांना बघून घेण्याची धमकी दिली होती. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता विजयप्रकाश हे त्यांचे सुपरवायझर प्रदीपकुमारशी बोलत होते. यावेळी तिथे रहमत नेहमीप्रमाणे दारुच्या नशेत आला होता. त्याला विजयप्रकाश यांनी साईट येऊ नकोस असे सांगून तेथून जाण्यास सांगितले. याच कारणावरुन त्याने त्यांच्याशी वाद घालून आता गंभीर परिणामाला सामोरे जा अशी धमकी दिली होती. हा प्रकार विजयप्रकाशने त्यांच्या मॅनेजरला फोनवरुन सांगितली होती. पहाटे तीन वाजता त्यांच्या साईटवर मटेरियलची गाडी आली होती. सर्व सामान काढल्यानंतर ते केबीनमध्ये गेले होते. तिथे त्यांना झोप लागली.

याच दरम्यान तिथे रहमत आला आणि त्याने झोपेतच असलेल्या विजयप्रकाश यांच्या गळ्यावर ब्लेडने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हल्ल्यानंतर रहमतने त्याला आता मॅनेजरची काय अवस्था करतो ते बघच अशी धमकी दिली होती. हा प्रकार तिथे उपस्थित बशीर चौधरी या सुरक्षारक्षकाच्या लक्षात येताच त्याने रहमतला ताब्यात घेतले. जखमी झालेल्या विजयप्रकाशला नंतर भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. उपचारानंतर तो माहीम पोलीस ठाण्यात आला आणि त्याने घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रेहमत शेखविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पहाटे तीन वाजता घडलेल्या या घटनेने कामगारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page