५४ लाखांच्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांची नोकराकडून चोरी
चोरीच्या दोन गुन्ह्यांची नोंद; महिलेस अटक तर दुसर्या शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मे २०२४
मुंबई, – सुमारे ५४ लाखांच्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांची दोन नोकरांनी चोरी केल्याची घटना काळबादेवी आणि मरिनड्राईव्ह परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एल. टी मार्ग आणि मरिनड्राईव्ह पोलिसांनी दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांत ज्योती दत्ताराम गुडये या २८ वर्षांच्या कर्मचारी महिलेस एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली तर दुसरा नोकर इंद्र बालेश्वर दास याचा मरिनड्राईव्ह पोलिसांकडून शोध सुरु आहे.
धवल चिमलाल शहा हे व्यवसायाने हिरे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत नवी मुंबईतील सानपाडा पसिरात राहतात. त्यांचे काळबादेवीतील रामवाडी, आदित्य पर्ल इमारतीमध्ये निओ डायमंड नावाचे सोने व हिरे खरेदी-विक्रीचे एक दुकान आहे. त्यांच्याकडे एकूण वीस कर्मचारी कामाला असून त्यात ज्योती गुडये हिचा समावेश होता. ती गेल्या एक वर्षांपासून त्यांच्याकडे कामाला होती. तिच्यावर दुकानातील खरेदी-विक्री दागिन्यांची संगणकावर नोंद करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मे २०२४ रोजी धवल शहा यांना सोन्याच्या स्टॉकमध्ये कमतरता दिसून आली. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कामावरील प्रत्येक कर्मचार्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान त्यांनी दुकानातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात त्यांना २४ एप्रिल ते ११ मे २०२४ याक ालावधीत ज्योती गुडये ही काम करताना दागिने चोरी करुन तिच्या कपड्याच्या आत लपवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी दुकानातील सर्व स्टॉकची तपासणी सुरु केली होती. त्यात त्यांना २४ लाख २९ हजार रुपयांचे सोन्याचे आणि हिर्यांचे बाराहून अधिक दागिने गहाळ झाल्याचे दिसून आले. ते दागिने ज्योती गुडये हिनेच चोरी केल्याचे उघडकीस येताच त्यांनी तिच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर ज्योतीविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती पोलीस कोठडीत असून तिच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे.
दुसरी घटना मरिनड्राईव्ह परिसरात घडली. विजय हरसुखलाल शहा (७४) हे त्यांच्या पत्नीसोबत श्री पाटण जैन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्याकडे इंद्र हा गेल्या तीन वर्षांपासून कामाला असून तो मूळचा झारखंडचा रहिवाशी आहे. त्यांना दोन मुले असून ते दोघेही २० वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. २ मेला तो त्याच्या भावाच्या लग्नासाठी झारखंड येथे निघून गेला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कपाटातील दागिन्यांची पाहणी केली होती. यावेळी त्यांना कपाटातून सातशे ग्रॅम वजनाचे सुमारे तीस लाखांचे विविध सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांनी कपाटात सर्वत्र दागिन्यांचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेही दागिने सापडले नाही. इंद्र दास यानेच दागिन्यांची चोरी केल्याचा त्यांचा संशय होता. ऑक्टोंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन इंद्र दास याने त्यांच्या कपाटातील तीस लाखांचे सातशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिन्यांची चोरी केले होते. त्यामुळे त्यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांत इंद्र दासविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.