चित्रपट निर्मितीसाठी दोन कोटीची देतो सांगून फसवणुक
अंधेरीतील घटना; चौघांविरुद्ध गुन्हा तर दोघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मे २०२४
मुंबई, – चित्रपट निर्मितीसाठी दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत करतो असे सांगून एका व्यक्तीच्या बँक खात्याशी संबंधित माहिती घेऊन बँक खात्यातून सुमारे ४८ लाखांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अमान कैलास राजपूत आणि विकास श्रीनिवास यादव अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी मोसीन अन्सारी आणि मेहराज अन्सारी हे दोघेही पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशा प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
यातील तक्रारदार अंधेरीतील शास्त्रीनगर अग्रवाल इस्टेट परिसरात राहत असून ते बॉलीवूडशी संबंधित आहेत. त्यांना एका चित्रपटाची निर्मिती करायची होती, त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. गेल्या आठवड्यात त्यांची अंधेरीतील न्यू लिंक रोडवरील क्रोमा शॉपसह इन्फिनिटी मॉलमध्ये संबंधित मोसीन आणि मेहराजशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांना चित्रपट निर्मितीसाठी दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून घेतली होती. या बँक खात्यातून त्यांनी परस्पर ४७ लाख २६ हजार रुपयांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. रक्कम त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. चित्रपट निर्मितीसाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन या चौघांनी त्यांच्या बँक खात्यातून पैशांचा अपहार केल्याचे अलीकडेच त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती, मात्र त्यांनी पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी चारही आरोपींविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चारही आरोपींविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अमान राजपूत आणि विकास यादव या दोघांन पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कटात मोसीन आणि मेहराज हे मुख्य आरोपी असून त्यांनी अटक आरोपी अमान राजपूत आणि विकास यादव यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे पळून गेलेल्या या दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.