मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ मे २०२४
मुंबई, – घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्त होडिंगला स्टॅबिलिटी प्रमाणपत्र दिल्याचा आरोपाखाली मुलुंड येथून अटक करण्यात आलेला इंजिनिअर मनोज रामकृष्ण संधू याला शुक्रवारी दुपारी एसआयटीने किल्ला कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला सहा दिवसांची म्हणजेच ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भावेश प्रभुदास भिंडे याच्यानंतर अटक झालेला मनोज हा दुसरा आरोपी असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलाशांचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. दुसरीकडे अटकेच्या भीतीने सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेणार्या भावेश भिंडे यांच्या सहकारी आणि कंपनीच्या संचालिका जान्हवी मराठे यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे तिच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच घाटकोपर येथे युवा कंपनीचे एक होर्डिंग जवळच असलेल्या एका पेट्रोलपंपावर कोसळून त्यात सतराजणांचा मृत्यू झाला होता तर ऐंशीहून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याचा तपास आधी गुन्हे शाखा तर नंतर एसआयटीकडे सोपविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत भावेश भिंडे याला १७ मेला पोलिसांनी अटक केली. बारा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर भावेशला गुरुवारी किल्ला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दुसरीकडे याच गुन्ह्यांत गुरुवारी या पथकाने मुलुंड येथून मनोज संधू या इंजिनिअरला अटक केली होती. त्याने दुर्घटनाग्रस्त होर्डिंगला स्टॅबिलिटी प्रमाणपत्र दिले होते. अटकेनंतर शुक्रवारी त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांकडून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र मनोजचे वकिल देवानंद मणेरकर यांनी पोलीस कोठडीला विरोध केला. मनोजने केवळ होर्डिंगची रचना केली होती. त्याने कधीच साईटला भेट दिली नव्हती. दुसरीकडे पोलिसांनी मनोज हे बीई सिव्हील इंजिनिअर असून मनपा नियमांची माहिती असून त्यांनी होर्डिंगला स्टॅबिलिटी प्रमाणपत्र दिले होते. त्यांनी मनपाच्या पॅनेलसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत का याचा तपास बाकी असल्याने त्यांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने मनोज संधूला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे कंपनीच्या माजी संचालिका जान्हवी मराठे हिने विशेष सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे तिला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.