नौसेनेच्या अधिकार्यासह डॉक्टर पत्नीची ऑनलाईन फसवणुक
घाटकोपर-कफ परेडची घटना; दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जून २०२४
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत नौसेनेच्या अधिकार्यासह डॉक्टर पत्नी अज्ञात सायबर ठगांनी ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना घाटकोपर आणि कफ परेड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी घाटकोपर आणि कफ परेड पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.
३३ वर्षांची तक्रारदार महिला ही घाटकोपरच्या भटवाडीत राहत असून तिचे पती डॉक्टर आहेत. एप्रिल महिन्यांत तिचा मोबाईल एका अज्ञात व्यक्तीने व्हॉटअपमध्ये ऍड केला होता. या ग्रुपमध्ये १७३ सभासद होते, त्यात गोल्ड आणि शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणुकीवर होणार्या फायद्याबाबतची माहिती दिली जात होती. ग्रुपचे ऍडमीन आशिष कचोलिया आणि विनोद सेन हे दररोज शेअरमार्केटची माहिती शेअर करत होते. कुठले शेअर खरेदी केल्यास फायदा होईल याबाबत माहिती दिली जात होती. ३० एप्रिलला ऍडमिनने तिच्याशी चॅट करुन तिला शेअरसह गोल्डमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यात तिला हमखास फायदा होईल असे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने त्यांच्यावर विश्वास ठेवून काही शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. त्यात तिला चांगला फायदा झाला होता. इतकेच नव्हे तर तिच्या बँक खात्यात प्राफिटची १ लाख ६९ हजाराची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यामुळे तिने गोल्डसह शेअरमध्ये आणखीन गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. १६ एप्रिल ते २८ मे २०२४ दरम्यान तिने शेअरसह गोल्डमध्ये ५ लाख ३० हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर तिला कुठलाही परतावा देण्यात आला नाही. वारंवार विचारणा करुनही ऍडमिन तिला प्रतिसाद देत नव्हते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने घाटकोपर पोलिसांत तक्रार केली होती.
दुसरी घटना कफ परेड परिसरात घडली. ३९ वर्षांचे तक्रारदार नौसेनेत ट्रायल अधिकारी म्हणून कामाला असून ते सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत कफ परेड परिसरात राहतात. त्यांचे एका खाजगी बँकेत खाते असून या बँकेने त्यांना क्रेडिट कार्ड दिले होते. या कार्डची डिटेल त्यांनी आतापर्यंत कोणालाही शेअर केली नव्हती. २१ मेला त्यांच्या मोबाईलवर दोन मॅसेज आले होते. या मॅसेजमध्ये त्यांच्या बँक खात्यातून काही रक्कम ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला असता त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन सुमारे ४६ हजार रुपये डेबीट झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी त्यांच्या कार्डची माहिती किंवा पासवर्ड कोणालाही शेअर केला नव्हता. तरीही त्यांच्या कार्डवरुन दोन ऑनलाईन व्यवहार झाले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचा क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याची विनंती केली होती. या घटनेनंतर त्यांनी सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर कॉल करुन तिथे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांनी कफ परेड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथेही तक्रार केली होती. या दोन्ही घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी दोन गुन्हे दाखल करुन अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत.