खरेदी केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन फसवणुक
२.५८ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जून २०२४
मुंबई, – खरेदी केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन एका शिपिंग कंपनीच्या अधिकार्याची २ कोटी ५८ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण पेमेंट घेतल्यानंतरही या दोघांनी या फ्लॅटची विक्री करुन पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे. दिव्या शर्मा आणि विशाल डोग्रा अशी या दोघांची नावे असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
रवीप्रतापसिंग श्यामनारायण सिंग हे मूळचे उत्तरप्रदेशच्या वाराणासीचे रहिवाशी आहेत. १९९२ पासून ते विविध शिपिंग कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहेत. २०१४ पासून ते सिंगापूरच्या एका खाजगी शिपिंग कंपनीत काम करत असून कामानिमित्त सिंगापूर येथे वास्तव्यास आहे. २०१० ते २०१४ या कालावधीत त्यांनी मुंबई शहरात नोकरी केल्याने त्यांना मुंबईत एक फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. सोशल साईटवर इस्टेट एजंटची माहिती घेताना त्यांची एका एजंटच्या माध्यमातून दिव्या शर्माशी ओळख झाली होती. जुहू येथील व्हेलेसिया अपार्टमेंटमध्ये तिच्या आईचा दोन बेडरुम आणि हॉल असा १२७५ चौ. फुटाचा एक फ्लॅट असून तो त्यांना विक्री करायचा आहे असे सांगितले होते. त्यासाठी तिने त्यांना फ्लॅटचे फोटो पाठविले होते. हा फ्लॅट पसंद पडल्याने त्यांच्यात २ कोटी ४५ लाखांमध्ये फ्लॅट खरेदी-विक्रीचा करार झाला होता. याच दरम्यान दिव्याने त्यांची ओळख विशालशी करुन दिली होती. फ्लॅटचा संपूर्ण व्यवहार विशाल करत असल्याने त्याच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करावी असे सांगितले. त्यामुळे त्यांनी विशालकडून फ्लॅटची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ऑगस्ट २०२० रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे ते उत्तरप्रदेशातील गावी आले होते. सर्व विधी पार पाडल्यानंतर ते दिव्या आणि विशालला भेटण्यासाठी मुंबईत आले होते. दिव्याला कोरोनाची लागण झाल्याने ती नानावटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, त्यामुळे त्यांनी विशालची भेट घेतली होती. या भेटीत त्यांच्या पेमेंटविषयी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी दिव्या आणि विशालच्या सांगण्यावरुन त्यांच्या बँक खात्यात जानेवारी २०२० ते जुलै २०२२ पर्यंत २ कोटी ५८ लाख २३ हजार ५५० रुपयांचे पेमेंट ट्रान्स्फर केले होते.
फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनसह इतर कामासाठी त्यांना सिंगापूर येथून येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी फ्लॅट त्यांचा मुलगा क्षितीज सिंग यांच्या नावाने करुन देण्याची विनंती केली होती. मात्र ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांची चौकशी केली असता दिव्या आणि विशालने या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री केल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी या दोघांकडे विचारणा करुन त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र या दोघांनी पैसे परत करण्यास नकार दिला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच ते सिंगापूरहून मुंबईत आले होते. घडलेला प्रकार वनराई पोलिसांना सांगून त्यांनी या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दिव्या शर्मा आणि विशाल डोग्रा यांच्याविरुद्ध फ्लॅटसाठी २ कोटी ५८ लाख रुपये घेऊन फ्लॅटचा ताबा न देता, फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.