सिनेअभिनेत्री रविना टंडनसह कारचालकावर हल्ल्याचा प्रयत्न
रॅश ड्रायव्हिंगचा आरोप करुन हुज्जत घालून धक्काबुक्की केली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जून २०२४
मुंबई, – रॅश ड्रायव्हिंगचा आरोप करुन हुज्जत घालून सिनेअभिनेत्री रविना टंडनसह तिच्या कारचालकावर एका जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, प्रकरण खार पोलीस ठाण्यात गेल्यानंतर असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे उघडकीस आले. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजमध्येही असा कुठला प्रकार घडला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधितांना योग्य ती समज देऊन सोडून देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची खार पोलिसांकडून चौकशी ुसरु आहे.
शनिवारी रात्री काही महिला लग्नाच्या कार्यक्रमावरुन घरी जात होत्या. खारच्या कार्टर रोडवरुन जात असताना तिथे रविना टंडनची कार आली, तिच्यासोबत तिचा कारचालक होता. कार मागे घेताना कारचालकाने या महिलेच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करुन या महिलांनी कारसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान रविना टंडन ही कारमधून उतरली आणि तिने या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रागाच्या भरात त्यांनी रविनासह तिच्या कारचालकावर धक्काबुक्की करुन हल्ला केला. तिने त्यांना मारहाण करु नका असे सांगण्याचा प्रयत्न केला, दुसरीकडे काहीजण त्यांच्या मोबाईलवरुन चित्रीकरण करत होते. त्याचाच एक व्हिडीओ नंतर सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या वादानंतर संबंधित प्रकरण खार पोलीस ठाण्यात गेले होते. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. यावेळी या महिलांनी केलेले सर्व आरोप बोगस असल्याचे उघडकीस आले. पोलीस ठाण्यात दोघांच्या वतीने प्रकरण मिटल्याचे सांगण्यात आले. कोणीही तक्रार न केल्यानंतर पोलिसांनी सर्वांना घरी जाण्याचा सल्ला दिला होता. या घटनेनंतर रविना टंडनकडून अधिकृत वक्तव्य आले नाही. मात्र खार पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.