मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जून २०२४
मुंबई, – नाकाबंदीमध्ये बाईक थांबविली म्हणून रागाच्या भरात एका पोलीस शिपाई महिलेस तिघांनी कानशिलात लगावून लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना वांद्रे येथील माहीम कॉजवे परिसरात घडली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी भादवीसह मोटार वाहन कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यात दोन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. मोहम्मद आयुब इंतजार अहमद खान, रुक्सार मोहम्मद आयुब खान आणि शरफान अब्दुल नबी शेख अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांना रविवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोमल विकास घाटगे या वरळीतील सर पोचखानावाला रोड, वरळी पोलीस वसाहतीत राहत असून सध्या वांद्रे पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. शनिवारी रात्री आठ वाजता ती नाईट ड्युटीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाली होती. यावेळी तिला वांद्रे मोबाईल पाचवर कर्तव्य देण्यात आले होते. तिच्यासोबत सहाय्यक फौजदार भोसले, पोलीस हवालदार घंटे असे दोघेजण होते. वरिष्ठांच्या आदेशानंतर रात्री अकरा वाजता वांद्रे येथील एस. व्ही रोड, माहीम कॉजवे परिसरात पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली होती. त्यामुळे ते तिघेही नाकाबंदीमध्ये त्यांचे कर्तव्य बजावत होते. यावेळी पोलिसांना एक व्यक्ती विनाहेल्मेट बाईक चालवून वेडीवाकडी वळण घेऊन स्वतसह इतर वाहनचालकाच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशी बाईक चालवत येत होता. त्यामुळे तिने त्याला थांबण्याचा इशारा केला. बाईक थांबविल्याचा राग आल्याने चालकासह त्याच्या मागे बसलेल्या महिलेने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर तिथे आणखीन एक बाईक आली, या बाईकवरील चालकासह महिलेने त्यांच्या नातेवाईकांची बाईक का थांबवली असा जाब विचारुन त्यांच्याशी वाद घातला. त्यांना शांत राहण्याचे आवाहन करुनही ते तिघेही पोलिसांशी वाद घालत होते. काही वेळानंतर एका महिलेने कोमल घाटगे हिचा हात पकडून जोरात पिरगाळून तिलाच लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. तिने हात सोडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर या महिलेने तिच्या कानशिलात लगावली. दुसरीकडे चालक आणि महिला पोलिसांशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करत होते.
या घटनेनंतर सहाय्यक फौजदार यांनी महाले यांना मोबाईलवरुन घडलेला प्रकार सांगून तिथे पोलिसांना पाठविण्याची विनंती केली होती. या घटनेची माहिती मिळताच तिथे पोलीस पथक रवाना झाले होते. यावेळी पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन महिलेसह तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. कोमल घाटगे यांच्या तक्रारीवरुन या तिघांविरुद्ध पोलिसांनी १८६, २७९, ३३२, ३३६, ३५३, ५०४, ३४ भादवी सहकलम १८४ मोटार वाहन अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. तिन्ही आरोपी घाटकोपर येथील एलबीएस मार्ग, पेश इमाम चाळीत राहत असून अब्दुल आणि रुक्सार यांचा स्वतचा व्यवसाय तर शरफान ही महिला एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.