मानसिक नैराश्यातून आयएएस अधिकार्याच्या मुलीची आत्महत्या
शासकीय इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जून २०२४
मुंबई, – गेल्या काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात आलेल्या लिपी विकास रस्तोगी नावाच्या एका २७ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना कफ परेड परिसरात घडली. लिपी ही आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची मुलगी असून तिच्या आत्महत्येने संपूर्ण रस्तोगी कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. तिच्याकडे पोलिसांना एक सुसायट नोट सापडली आहे. त्यात तिने तिच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये असे नमूद केले आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. लवकरच तिच्या आई-वडिलांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.
ही घटना सोमवारी पहाटे चार वाजता कफ परेड येथील एका शासकीय इमारतीमध्ये घडली. विकासचंद्र रस्तोगी आणि राधिका रस्तोषी हे दोघेही आयएएस अधिकारी आहेत. विकास हे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागात कामाला आहे. अतिशय हुशार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ते परिचित आहेत. त्यांची पत्नी राधिका हीदेखील आयएएस अधिकारी आहेत. २७ वर्षांची लिपी ही त्यांची मुलगी आहे. तिने पहाटे चार वाजता शासकीय इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेतली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडून ही माहिती मिळताच कफ परेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. लिपीला पोलिसांनी तातडीने जवळच्या जी. टी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्याकडे पोलिसांना एक सुसायट नोट सापडली असून त्यात तिने तिच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद केले आहे.
लिपी ही हरियाणा येथील सोनीपत शहरात एलएलबीचे शिक्षण घेत होती. तिच्या शैक्षणिक कामगिरीमुळे ती काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. त्यातून तिला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्यातून तिने दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जाते. तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या पालकांकडे सोपविण्यात आला. लिपीच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबियांसह नातेवाईकांना प्रचंड मानसिक धकक्का बसला आहे. दुसरीकडे कफ परेड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. लवकरच तिच्या आई-वडिलांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. तिच्या आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही, मात्र शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीमुळे तिने आत्महत्या करुन जीवन संपविल्याचे बोलले जाते. लिपीच्या आत्महत्येने संपूर्ण रस्तोगी कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.