लुक आऊट नोटीस बजाविलेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

आंतरराष्ट्रीय विमानतळातील इमिग्रेशनच्या चौकशी कक्षेतील घटना

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ जून २०२४
मुंबई, – विनयभंगासह आयटीच्या एका गुन्ह्यांत कर्नाटक पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजाविलेल्या २४ वर्षांच्या आरोपीस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. मोहम्मद आफ्रिद तचनंदी मोईदू अशरफ असे या आरोपीचे नाव असून इमिग्रेशन विभागाच्या चौकशीत कक्षेत सेफ कस्टडीत असताना त्याने तिक्ष्ण हत्याराने हाताच्या कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिथे उपस्थित अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. रक्तबंबाळ झालेल्या मोहम्मद आफ्रिदला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथेच त्याच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी मोहम्मद आफ्रिदविरुद्ध सहार पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश इमिग्रेशन अधिकार्‍यांना दिले आहेत.

इंद्रजीत हरिदास तिरपुडे हे पालघर परिसरात राहत असून सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता कामावर हजर झाले होते. यावेळी त्यांना विंग इंचार्ज म्हणून ड्युटी देण्यात आली होती. सकाळी दहा वाजता इमिग्रेशन अधिकारी सोनाक्षी शंकर यांनी मोहम्मद आफ्रिद याला त्यांच्यासमोर हजर केले होते. तो दुबईतून मुंबईत आला होता. त्याच्याविरुद्ध कर्नाटकच्या कोडागु जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लुक आऊट नोटीस जारी केली होती. चौकशीअंती मोहम्मद आफ्रिद हा मूळचा कर्नाटकचा रहिवाशी आहे. गेल्या वर्षी त्याच्याविरुद्ध सिद्धापुरा पोलीस ठाण्यात ३५४ डी भादवीसह ६६ क, ६६ ई आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत तो वॉण्टेड होता. तो विदेशात असल्याची माहिती प्राप्त होताच त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले होते. त्यानंतर तो दुबईहून सोमवारी मुंबईत आला होता. त्याच्याविरुद्ध एलओसी जारी करण्यात आल्याने त्याला इमिग्रेशन अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

ताब्यात घेतल्यानंतर त्याला इमिग्रेशन विभागाच्या चौकशी रुममधील सेफ कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याच्या अटकेची माहिती नंतर कर्नाटक पोलिसांना देण्यात आली होती. त्यामुळे त्याचा ताबा घेण्यासाठी सिद्धापुरा पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत येण्यासाठी निघाले होते. सकाळी साडेअकरा वाजता त्याने तिक्ष्ण हत्याराने स्वतच्या हाताच्या मनगटाची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही माहिती नंतर सहार पोलिसांना देण्यात आली होती. जखमी झालेल्या मोहम्मद आफ्रिदला नंतर कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती सुधारत असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी इंद्रजीत तिरपुडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद आफ्रिद याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सकाळी घडलेल्या घडलेल्या या घटनेने तिथे उपस्थित अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page