ठकठक करुन चोरी करणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
दोन आरोपींना मेरठहून अटक; चोरीचे २१ मोबाईल हस्तगत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ जून २०२४
मुंबई, – कारचालकाचे लक्ष विचलित करुन मोबाईलसह इतर मौल्यवान वस्तू चोरी करणार्या एका आंतरराज्य ठकठक टोळीचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना मेरठ येथून पोलिसांनी अटक केली असून या दोघांकडून पोलिसांनी चोरीचे २१ हून अधिक मोबाईल चोरी हस्तगत केले आहे. फईम शमीम शेख आणि मोहम्मद फईम अलमुद्दीन खान ऊर्फ बिल्ला अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने शुक्रवार ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने ५० ते ६० हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे यांनी सांगितले.
१८ मार्चला यातील तक्रारदार त्यांच्या कारमधून मालाडच्या एस. व्ही रोड, एमटीएनएलच्या दिशेने जात होते. त्यांची कार एका सिग्नलजवळ थांबली असता तिथे एक तरुण आला आणि त्याने काचेवर ठकठक करुन त्यांनी कार त्याच्या पायावरुन नेल्याचे सांगितले. त्यानंतर तो त्यांच्याशी वाद घालू लागला. त्यांचे लक्ष विचलित करुन त्याच्या दुसर्या सहकार्याने त्यांचा कारमधील ऍपल कंपनीचा मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी मालाड पोलिसांत मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांत अशा गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने त्याची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. तसेच या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश परिमंडळ अकराच्या सर्वच पोलिसांना देण्यात आले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, पोलीस हवालदार राजेश तोंडवळकर, संतोष सातवसे, जयदीप जुवाटकर, अमीत गावड, जॉन फर्नाडिस, पोलीस शिपाई स्वप्नील काटे, मंदार गोंजारी, सचिन गायकवाड, रामचंद्र महाडिक, समाधान वाघ, आदित्य राणे यांनी तपासाला सुरुवात केली होती.
परिसरातील १२५ ते १५० सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यांचा शोध सुरु असतानाच या पथकाने मालाड येथे पुन्हा अशाच प्रकारे गुन्हा करण्याच्या उद्देशाने आलेल्या फईम शेख आणि मोहम्मद फईम खान या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत ते दोघेही वाहनांच्या काचांवर ठकठक करुन, कारचालकांचे लक्ष विचलित करुन कारमधील मोबाईलसह इतर मौल्यवान वस्तू चोरी करणारे सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांची स्वतची एक ठकठक टोळी असून त्यांनी मुंबईसह काशिमिरा, मिरारोड, दिल्ली, बंगलोर, मेरठ येथे ५० ते ६० हून अधिक गुन्हे केल्याची कबुली दिली. या दोघांकडून पोलिसांनी चोरीचे २१ हून अधिक मोबाईल जप्त केले आहेत. दोन्ही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशच्या मेरठ शहरातील रहिवाशी असून चोरीसाठी ते दोघेही मुंबईत येत होते. चोरीनंतर काही दिवस नागपाडा येथील गेस्ट हाऊसमध्ये राहिल्यानंतर ते पुन्हा उत्तरप्रदेशला जात होते. पोलिसांनी पकडू नये याची ते दोघेही पुरेपुरे काळजी घेत होते. एकाच ठिकाणी न राहता ते सतत त्यांची जागा बदलत होते. चोरी केलेल्या मोबाईलचे सुट्टे भाग करुन त्याची विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे यांनी वर्तविली आहे.