मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – नेहमीच गजबजलेला परिसर म्हणून परिचित असलेल्या डोंगरीच्या बाबा दर्गामध्ये काही अतिरेकी घुसल्याच्या निनावी कॉलमुळे एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण दर्गा परिसराची पाहणी केल्यानंतर ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अतिरेकी घुसल्याची खोटी माहिती देऊन तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच एका ८३ वर्षांच्या वयोवृद्धाला डोंगरी पोलिसांनी अटक केली. भगवान रामचंद्र भापकर ऊर्फ नजरुल इस्लाम शेख असे या आरोपीचे नाव असून तो विक्रोळीतील टागोरनगरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डोंगरीतील बाबा दर्गा परिसरर नेहमीच गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन बाबा दर्गामध्ये काही अतिरेकी घुसले आहे. त्यात काही महिलांसह पुरुष अतिरेक्यांचा समावेश असून त्यांच्याकडे अत्याधुनिक रायफली आहेत. ही माहिती दिल्यानंतर समोरील व्यक्तीने फोन कट केला होता. त्यामुळे कंट्रोल रुममधून ही माहिती डोंगरी पोलिसांना दिली. या माहितीनंतर स्थानिक पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. संपूर्ण दर्गा परिसराची तपासणी करण्यात आली. मात्र तिथे पोलिसांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. हा बोगस कॉल असल्याचे लक्षात येताच सहाय्यक फौजदार अंकुश सावणे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सार्वजनिक शांतता बिघडवून, जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच इतर नागरिकांना पोलिसांकडून जाणार्या सुरक्षात्मक उपाययोजनेमुळे त्रास व्हावा या उद्देशाने खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अज्ञात कॉलरचा शोध सुरु केला होता. कंट्रोल रुममधून पोलिसांना एक मोबाईल क्रमांक प्राप्त झाला होता. या मोबाईल क्रमांकाची माहिती काढली असता तो क्रमांक डोंगरीतील चारनळ पोलीस चौकीजवळील शफी मशिद, सामंत नानजी मार्गावरील एका पीसीओ बूथचा असल्याचे उघडकीस आले. या बूथचालकाकडे चौकशी केल्यानंतर त्याने एका वयोवृद्धाने कॉल केल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने मिळालेल्या माहितीवरुन भगवान भापकर ऊर्फ नजरुल शेख या ८३ वर्षांच्या वयोवृद्धाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यानेच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला बाबा दर्गामध्ये अतिरेकी घुसल्याची माहिती दिल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.