फ्लॅटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने १७.६८ कोटीची फसवणुक
गोरेगाव येथील घटना; सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – गोरेगाव येथील सिद्धार्थनगरातील निर्माणधीन इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट खरेदीवर गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन सहाजणांची १७ कोटी ६८ लाखांची फसवणुक करण्यात आली आहे. अकरा वर्ष उलटूनही संबंधित सहाजणांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही किंवा फ्लॅटसाठी दिलेले पैसे परत केले नाही. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी चार विकासकासह सातजणांविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पराग मुनोत, मोफतराज मुनोत, अनुज मुनोत, इस्माईल कांगा, देवेश भट, नरेंद्र लोंढा आणि ओमप्रकाश मेहता अशी या सातजणांची नावे आहेत. या सर्वांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
६१ वर्षांचे ईश्वरलाल मधुकरभाई वंजारा हे कांदिवलीतील अशोकनगर परिसरात राहतात. २०१८ साली ते एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. एप्रिल २०१३ रोजी त्यांना एका एजंटकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गोरेगाव येथील कल्पतरु रेडियन्स या इमारतीचे बांधकाम सुरु असून तिथे आताच फ्लॅट बुक केल्यास त्यांना फायदा होईल. त्यांना फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यामुळे ते गोरेगाव येथील सिद्धार्थनगरच्या बांधकाम साईटवर गेले होते. तिथेच त्यांची विकासक आणि प्रमोटर पराग, मोफतराज, अनुज मुनोत, त्यांचे पार्टनर इस्माईल कांगा यांच्याशी ओळख झाली होती. या प्रोजेक्टचे इंचार्ज देवेश भट तर संचालक नरेंद्र लोंढा होते. त्यांनी त्यांना संपूर्ण प्रोजेक्टची माहिती सांगून त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. २०१७ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन फ्लॅटचा ताबा दिला जाईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिथे टू बीएचके फ्लॅट सुमारे सव्वादोन कोटी रुपयांमध्ये बुक केला होता. फ्लॅट बुक केल्यानंतर त्यांनी कंपनीच्या बँक खात्यात टप्याटप्याने दोन कोटी नऊ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. पेमेंटनंतर त्यांना नवव्या मजल्यावर ८३९ चौ. फुटाचा टू बीएचबी फ्लॅट अलोट करण्यात आला होता.
काही दिवसांनी फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्त आले होते. त्यासाठी त्यांना सुमारे अकरा लाख रुपये खर्च आला होता. अशा प्रकारे त्यांनी फ्लॅटसाठी मुनोज आणि कांगा यांच्या कंपनीत सुमारे सव्वादोन कोटी रुपये दिले होते. जून २०१७ दरम्यान फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान त्यांची चेतन दिलीप नेगांधी, जयेश आनंद चौधरी, राकेश शहा, जितेंद्र जैन आणि विशाल बंधे यांच्याशी ओळख झाली होती. त्यांच्याप्रमाणे चेतन गांधी यांनी संबंधित आरोपींना ३ कोटी ४६ लाख, जयेश चौधरी यांनी ४ कोटी १६ लाख, राकेश शहा यांनी २ कोटी ८१ लाख, विशाल बंधे यांनी ३ कोटी ३३ लाख आणि जितेंद्र जैन यांनी १ कोटी ७१ लाख असे १५ लाख ४८ लाख रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र त्यांनाही दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा देण्यात आला नव्हता. सप्टेंबर २०२२ रोजी त्यांच्यासह ५० गुंतवणुदारांनी आरोपींच्या सांताक्रुज येथील कार्यालयात भेट घेतली होती, यावेळी मुनोत आणि कांगा यांनी सहा महिन्यांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य केले होते. मात्र एक वर्ष उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही.
अशा प्रकारे या आरोपींनी त्यांच्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ईश्वरलाल वंजारासह इतर पाचजणांकडून १७ कोटी ६८ लाख रुपये घेतले, मात्र अकरा वर्ष उलटूनही फ्लॅटचा ताबा दिला नाही. फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा परस्पर अपहार करुन सहाजणांची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर पराग मुनोत, मोफतराज मुनोत, अनुज मुनोत, इस्माईल कांगा, देवेश भट, नरेंद्र लोंढा आणि ओमप्रकाश मेहता यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०९, ४२०, ३४ भादवी सहकलम महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून संबंधित सर्व सातही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.