शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणार्या मुख्य आरोपीस अटक
फसवणुक झालेल्यांमध्ये पोलीस हवालदारासह मित्राचा समावेश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एका पोलीस हवालदारासह मित्राची सुमारे पंधरा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या सलील सदानंद सांबारी या मुख्य आरोपीस जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याचा सहकारी विद्याधर विष्णू शिरोडकर याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. विद्याधर हा तक्रारदार पोलीस हवालदाराचा बालपणीचा मित्र असून त्याने सलीलच्या मदतीने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
५२ वर्षांचे तक्रारदार पोलीस हवालदार असून सध्या त्यांची नेमणूक संरक्षण आणि सुरक्षा विभागाात आहे. विद्याधर हा त्यांचा बालपणीचा मित्र असून त्यानेच त्यांची सलीलसोबत एप्रिल २०२२ रोजी ओळख करुन दिली होती. सलील हा शेअर ट्रेडर असून त्याने अनेकांचे पैसे शेअरमध्ये गुंतविले आहे. त्याने गुंतवणुक केलेल्या पैशांवर अनेकांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे त्याने त्याच्याकडे शेअरमध्ये गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता. सलीलची भेट घेतल्यानंतर त्याने त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर दर तीन महिन्यांने दहा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना बॉण्ड पेपर हा करार लिहून देतो असे सांगितले होते. त्यामुळे या दोघांवर विश्वास ठेवून त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. २६ एप्रिल ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत त्यांनी सलीलकडे तेरा तर त्यांच्या मित्राने पाच लाखांची गुंतवणुक केली होती. ही रक्कम दिल्यानंतर त्याने त्यांना बॉण्ड पेपरवर महिना दहा टक्के व्याज देण्याचे, तसेच त्याला पैसे देणे शक्य झाले नाहीतर तो त्याच्या शेअरची विक्री करुन त्यांना गुंतवणुकीसह व्याजाची रक्कम देईल असे मान्य केले होते.
ठरल्याप्रमाणे त्याने त्यांना तीन महिन्यांचे तीन लाख रुपये व्याज दिले. मात्र नंतर त्याने त्यांना व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. त्याच्याकडून त्यांना व्याजापोटी चौदा लाख रुपये अपेक्षित होते. मात्र त्याने व्याजाची रक्कम दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे शेअरमध्ये गुंतवणुक केलेली रक्कम परत करण्यास सांगितले. आज-उद्या करुन त्याने त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान सलीलने अशाच प्रकारे अनेकांकडून शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे घेऊन त्यांची फसवणुक केली होती. त्यांच्याच परिचित तीन ते चारजणांनी सलीलने त्यांना शेअर गुंतवणुकीच्या नावाने गंडा घातल्याचे सांगितले. सलीलने विद्याधरला हाताशी धरुन ही फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सलील सांबारी आणि विद्याधर शिरोडकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताताच पळून गेलेल्या सलीलला पोलिसांनी अटक केली. चौकशीत सलील हा सराईत गुन्हेगार असून त्याने अनेकांना शेअर गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देतो असे सांगून गंडा घातला आहे. या दोघांनी तक्रारदार पोलीस हवालदारासह त्यांच्या मित्रांची पंधरा लाखांची फसवणुक केली असली तरी हा आकडा त्यापेक्षा जास्त असल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.