रेकी करुन बँक खातेदारांना लुटणार्या टोळीचा पर्दाफाश
महिलेसह चौघांना अटक; लुटमारीचे इतर गुन्हे उघड होणार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० एप्रिल २०२४
मुंबई, – रेकी करुन बँकेतून पैसे काढणार्या खातेदारांना लुटणार्या एका टोळीचा रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना पोलिसांनी अटक केली असून ही महिला कटातील मुख्य आरोपी आहे. या टोळीच्या अटकेने लुटमारीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यास्मीन इक्बाल खोकर आफ्ताब इरफान खान, प्रभाकरण जयराम अन्सारी आणि अशफाक सलमान शेख अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
झरीनाबानो फारुख अहमद सिद्धीकी ही महिला वडाळा येथे राहते. ६ जूनला ती नवी मुंबईतील बेलापूरच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकेत दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी गेली होती. नोटा बदलून ती वडाळा येथे आली आणि टॅक्सीने घराच्या दिशेने जात होती. यावेळी राहुलनगर, शिवशाही इमारतीजवळ बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने तिच्याकडील कॅश असलेली बॅग हिसकावून पलायन केले होते. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने आरएके मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जगताप, प्रभारी पोलीस निरीक्षक श्याम बनसोडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब गादेकर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढेरे, योगेश खरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव, सुरेश घार्गे, पोलीस हवालदार अनिल कोळेकर, रामचंद्र पोटे, ज्ञानेश्वर केकाण, सुरज डांगे, किरण देशमुख, सचिन आहेर, निखील राणे, महिला पोलीस शिपाई सोनू गायकवाड यांनी तपास सुरु करताना परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसंानी बाईक चालविणारा आफ्ताब खान आणि कॅश असलेली बॅग खेचणारा प्रभाकरण अन्सारी या दोघांना मानखुर्द येथील लल्लूभाई पार्क परिसरात ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत यास्मीन आणि अशफाक यांचे नावे समोर आली. त्यानंतर या दोघांनाही ऍण्टॉप हिल येथून पोलिसांनी अटक केली. तपासात यास्मीन या कटातील मुख्य आरोपी असून तिची एक टोळी आहे. ही टोळी बँकेतील खातेदारांची रेकी करुन बँकेतून कॅश काढणार्या खातेदारांवर पाळत ठेवून कॅश चोरी करुन पळून जात होती. या चौघांकडून पोलिसांनी कॅश, मोबाईल, बॅग आणि गुन्ह्यांतील बाईक असा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.