मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० एप्रिल २०२४
मुंबई, – सुमारे ८८ लाख रुपयांच्या फसवणुकप्रकरणी सुनिल पारसमनी लोढा या व्यावसायिकाविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिड कोटीचे सागवान लाकूड खरेदी करायचे असल्याची बतावणी करुन ८८ लाखांच्या लाकूडचे पेमेंट न करता सुनिल लोढाने पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या मिसिंगची तक्रार केली असून त्याचा दिडोंशी आणि बांगुरनगर पोलीस शोध घेत आहेत. सुनिलने अनेक व्यापार्यांकडून माल खरेदी करुन त्यांचे पेमेंट न करता त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
भवानीशंकर बनवारीलाल जांगीड हे व्यावसायिक असून त्यांचा स्वतचा लाकूड विक्रीचा व्यवसाय आहे. ते मालाड परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून त्यांची ओम ट्रेडिंग नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी विविध प्रकारच्या लाकूड विक्री करते. त्यांची कंपनी मालाडच्या शुभम प्लावूड कंपनीला दहा वर्षांपासून लाकूड विक्री करत असून कंपनीची मालकीण कैलाशीदेवी व तिचा मुलगा सुनिल लोढा हे त्यांच्या परिचित आहेत. दहा वर्षांपासून त्यांच्यासोबत भवानीशंकर जांगीड यांचे व्यावसायिक संबंध आहेत. सुनिलने त्यांच्या कंपनीतून अनेकदा लाकूड घेऊन त्याचे पेमेंट वेळेवर केले होते. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. ८ मार्च ते २८ मार्च २०२३ या कालावधीत त्यांच्या कंपनीने सुनिल लोढाच्या कंपनीला ८८ लाख ५० हजार रुपयांच्या सागवान लाकूड विक्री केली होती. त्यासाठी त्यांना दोन सिक्युरिटी धनादेश देण्यात आले होते. मात्र ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. या घटनेनंतर त्यांनी सुनिल लोढाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. काही दिवसांनी त्यांना सुनिल हा घरातून निघून गेला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याची मिसिंगची तक्रार दिडोंशी पोलीस ठाण्यात केली होती.
सुनिलने त्यांच्यासह इतर व्यावसायिकाकडून क्रेडिवर माल खरेदी केला होता, मात्र कोणाचेही पेमेंट न करता घरातून पलायन केले होते. सतत कॉल करुनही त्याचा संपर्क होत नसल्याने त्यांनी बांगुरनगर पोलिसात तक्रार केली होती. त्यात त्यांनी सुनिलने ऑर्डर केलेल्या दिड कोटीच्या सागवान लाकूडची विक्री केल्याचे नमूद करुन ८८ लाख ५० हजार रुपयांचे पेमेंट न करता त्यांची फसवणुक केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. सुनिल हा मालाडच्या राणी समती मार्गावरील पासपोर्ट कार्यालयाजवळील कनकिया लेवल्स अपार्टमेंटमध्ये राहत असून त्याच्या घराला टाळे असल्याचे दिसून आले आहे.