मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – वांद्रे येथील बीकेसीच्या भारत डायमंड बोर्सच्या एक, दोन नव्हे तब्बल पंचवीस हिरे व्यापार्याची एका ब्रोकरने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्यापार्याला हिरे दाखविण्यासाठी घेतलेल्या सुमारे साडेसात कोटीच्या हिर्याच्या अपहार करुन या ब्रोकरने पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच या हिरे व्यापार्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मेहुल सतीश झव्हेरी या ब्रोकरविरुद्ध तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश बीकेसी पोलिसांना दिले आहेत.
महेश भवनभाई गजेरा हे हिरे व्यापारी असून ते आर राजेश एक्सपोर्ट कंपनीत संचालक म्हणून काम करतात. विलेपार्ले येथील रहिवाशी असलेल्या महेश गजेरा यांचे बीकेसीच्या भारत डायमंड बोर्स परिसरात एक कार्यालय आहे. या कार्यालयातून ते हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. मेहुल हा हिरे ब्रोकर म्हणून काम करत असून ते त्याला काही वर्षांपासून ओळखतात. अनेकदा तो त्यांच्याकडून व्यापार्यांना दाखविण्यासाठी क्रेडिटवर हिरे घेऊन जात होता. १३ डिसेंबर २०२३ रोजी मेहुल हा त्याचा मित्र जयसोबत त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याच्याकडे हिरे खरेदी करणारा एक व्यापारी असून त्याला हिर्याची गरज आहे असे सांगून त्यांच्याकडून त्याने काही हिर्यांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला आठ लाखांचे हिरे क्रेडिटवर दिले होते. काही दिवसांनी तो पुन्हा त्यांच्या कार्यालयात आला आणि त्यांनी आणखीन हिर्यांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला २८ डिसेंबरला सोळा लाख तर ११ जानेवारीला ७९ लाख रुपयांचे हिरे दिले होते. अशा प्रकारे त्यांनी त्याला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत एक कोटी दोन लाख रुपयांचे हिरे दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिरे किंवा हिर्याच्या विक्रीतून आलेले पेमेंट जमा केले नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याची शहानिशा केली होती. त्यात त्यांना मेहुलने त्यांच्यासह भारत डायमंड बोर्स मार्केटमधील मियानी इम्पेक्स कंपनीकडून १९ लाख १४ हजार, नयन जेम्स कंपनीकडून ४६ लाख ८४ हजार, ब्राहम इम्पेक्स कंपनीकडून २४ लाख २८ हजार, रत्ना डियाम कंपनीकडून ११ लाख ८२ हजार, एस. एस डियाम कंपनीकडून १२ लाख १० हजार, हिना इम्पेक्स कंपनीकडून ११ लाख ५८ हजार, ब्लॉसम कंपनीकडून १२ लाख ८२ हजार, चामुंडा एक्सपोर्ट कंपनीकडून ५ लाख ३ हजार, विकास इंटरप्रायझेस कंपनीकडून १२ लाख २५ हजार, महादेव कार्पोरेशन कंपनीकडून ३६ लाख ८४ हजार, बी. मानेक एक्सपोर्ट कंपनीकडून ५७ लाख २२ हजार, एस. जोगानी एक्सपोर्टकडून २३ लाख ९ हजार, पोपटलाल नाथलाल शहाकडून २२ लाख २५ हजार, एस. मिलन जेम्सकडून २७ लाख ६५ हजार रुपये, दामोदर इम्पेक्सकडून ५४ लाख १९ हजार, मातृश्री इम्पेक्सकडून ५५ लाख ६२ हजार, सुप्रिम एक्सपोर्टकडून १२ लाख ४५ हजार, शाईन स्टारकडून ८ लाख ३४ हजार, कुशल जेम्सकडून १५ लाख १५ हजार असे साडेसात कोटी रुपयांचे हिरे विक्रीसाठी क्रेडिटवर घेऊन २४ हिरे व्यापार्याकडून घेतलेल्या हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केली होती. ही फसवणुक नोव्हेंबर २०२३ ते जानवेारी २०२४ या कालावधीत झाल्याचे तपासात उघडकीस आले होते.
हा प्रकार उघडकीस येताच महेश गजेरा यांनी बीकेसी पोलिसात मेहुल झव्हेरीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. मेहुल हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.