लोकसभा निवडणुकीत मतदान करणार्या बांगलादेशी नागरिकांना अटक
भारतात घुसखोरी केल्यानंतर विदेशातील नोकरीसाठी बोगस पासपोर्ट मिळविल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) – देशात अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बोगस मतदान करणार्या बांगलादेशी नागरिकांना जुहू युनिटच्या एटीएस अधिकार्यांनी अटक केली. रियाज हुसैन, सुल्तान सिद्धीक शेख, इब्राहिम शफीउल्ला शेख आणि फारुख उस्मानगनी शेख अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. भारतात घुसखोरी केल्यांनतर या चौघांनी बोगस दस्तावेजाच्या मदतीने बोगस पासपोर्ट मिळविले होते, आखाती देशांसह इतर देशात नोकरीसाठी याच बोगस भारतीय पासपोर्टचा वापर केला जाणार होता. या गुन्ह्यांत पाच बांगलादेशी नागरिकांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्यातील एकजण आखाती देशात नोकरीसाठी गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
भारतात घुसखोरी करुन काही बांगलादेशी नागरिकांनी बोगस दस्तावेजाच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळविले आहे. याच पासपोर्टवर तो विदेशात नोकरीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती जुहू युनिटच्या एटीएसच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच रियाज हुसैन, सुल्तान शेख, इब्राहिम शेख आणि फारुख शेख या चौघांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. चौकशीत ते चौघेही बांगलादेशातील नोवाखालीच्या बशीरहाट, चंदेहाट, कबीर हाट आणि साहेबर हाटचे रहिवाशी आहे. रियाज हा अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहत असून इलेक्ट्रीशियन म्हणून काम करत होता. सुल्तान हा मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून तो रिक्षाचालक आहे. इब्राहिम हा मुलुंडच्या माहुलगाव, म्हाडा कॉलनीत राहत होता, तिथेच तो भाजी विक्रीचे काम करत होता. बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून ते चौघेही भारतात पळून आले होते. गुजरातच्या सुरत शहरात वास्तव्यास असताना त्यांनी बोगस भारतीय दस्तावेज बनविले होते. या दस्तावेजाच्या मदतीने त्यांनी सुरत पासपोर्ट कार्यालयातून भारतीय पासपोर्ट मिळविले होते. बांगलादेशी पासपोर्टवर विदेशात नोकरी मिळत नसल्याने त्यांना बोगस भारतीय पासपोर्टवर विदेशात नोकरीसाठी जायचे होते. त्यांच्या पाच सहकार्यांशी अशाच प्रकारे बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळविले होते, त्यानंतर एक बांगलादेशी नागरिक सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेला होता.
या बांगलादेशी नागरिकांनी अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आले आहे. या चौघांविरुद्ध ४६५, ४६८, ४७१, ३४ भादवी सहकलम भारतीय पासपोर्ट अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या बांगलादेशी नागरिकांचा दशहतवादी कृत्यांशी काही संबंध आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.