अज्ञात कारणावरुन ४५ वर्षांच्या व्यक्तीवर घरात घुसून हल्ला
अंधेरीतील घटना; हल्ल्यानंतर मारेकर्याचे रिक्षातून पलायन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – अज्ञात कारणावरुन घरात घुसून एका ४५ वर्षांच्या व्यक्तीवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अंधेरीतील वर्सोवा परिसरात उघडकीस आली आहे. हल्ल्यात दिपक सुभाष राठोड हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी अज्ञात मारेकर्याविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्याचा शोध सुरु केला आहे. सीसीटिव्ही फुटेजवरुन हा मारेकरी एका रिक्षातून पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. या हल्ल्यामागील कारण मात्र समजू शकले नाही.
अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड, शास्त्रीनगर चाळीत शीतल दिपक राठोड ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. दिपक हे तिचे वडिल असून ते तिच्या घरापासून काही अंतरावर एकटेच राहतात. सोमवारी शीतल ही तिच्या परिचित लोकांसोबत एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेली होती. रात्री घरी आल्यानंतर तिला तिच्या वडिलांवर अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचे समजले होते. त्यांच्या छातीला, पाठीला, हाताला, दंडाला तिक्ष्ण हत्याराने भोसकल्याच्या अनेक जखमा होत्या. रक्तबंबाळ झालेल्या दिपकला स्थानिक रहिवाशांनी तातडीने अंजुमन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी शीतल राठोडकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. काही प्रत्यक्षदर्शीनी सुभाष राठोड यांच्या घरातून एका व्यक्तीला घाईघाईने बाहेर जाताना पाहिले होते, तो नंतर एका रिक्षातून बसून निघून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पळून गेलेल्या मारेकर्याचा शोध सुरु केला आहे. सुभाष यांच्यावर हल्ला कोणी केला, हल्ल्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा उलघडा होऊ शकला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.