मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – मुलुंड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार सचिन गंगाधर वाघमारे यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच मारहाण करणार्या शार्दुल सतीश पाटील या आरोपीस मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजता मुलुंड येथील एमटीएनएल रोड, नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेटजवळील द नेस्ट सोसायटी परिसरात घडली. याच सोसायटीव्या बी/५०३ फ्लॅटमध्ये सचिन वाघमारे हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. सध्या ते मुलुंड वाहतूक विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. या सोसायटीच्या बाजूला काही अर्धवट बांधकाम केलेल्या इमारती असून तिथे रात्रीच्या वेळेस काही तरुण मद्यप्राशन करण्यासाठी येतात. त्यामुळे परिसरात चोर्यामार्याच्या घटना घडत असल्याने सोसायटीच्या सर्व रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी सचिन वाघमारे हे दुपारी तीन वाजता कामावर जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांना परिसरात एक तरुण संशयास्पद फिरताना दिसून आला. या घटनेनंतर त्यांनी त्याच्याकडे जाऊन त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्याचे नाव काय, कुठे राहतो, कोठून आला आहे, याच परिसरात राहतो का याबाबत विचारणा सुरु असताना त्याने त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. तुझी पोलीसगिरी मला दाखवू नकोस असे सांगून त्याने त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याने त्यांची कॉलर पकडून हाताने आणि लाथेने मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी तिथे स्थानिक रहिवाशी आले आणि त्यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. तरीही तो त्यांना शिवीगाळ करत होता. ही माहिती नंतर मुलुंड पोलिसांना देण्यात आली. काही वेळानंतर तिथे पोलीस आले आणि त्यांनी या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचे नाव शार्दुल पाटील असल्याचे उघडकीस आले. तो एका खाजगी कंपनीत कामाला असून मुलुंडच्या नंदनवन इंडस्ट्रियलजवळील आशानगर परिसरात राहतो. याप्रकरणी सचिन पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शार्दुल पाटीलविरुद्ध गणवेशातील पोलीस कर्मचार्याला शिवीगाळ करुन मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केल्याचे सागितले.