विविध बतावणी करुन फसवणुक करणार्या गुन्हेगारास अटक
पाच वर्षांपासून वॉण्टेड होता; १५ गुन्ह्यांची उकल करण्यात यश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – विविध बतावणी करुन फसवणुक करणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अंधेरी पोलिसांच्या विशेष पथकाने बेठ्या घातल्या. मंसुर मुन्ना शाबीर खान असे या ३८ वर्षीय गुन्हेगाराचे नाव असून गेल्या पाच वषा्रंपासून तो विविध गुन्ह्यांत वॉण्टेड होता. जवळपास ४०० ते ५०० सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या अटकेने पंधराहून अधिक फसवणुकीसह चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. लवकरच त्याचा संबंधित पोलिसांकडे सोपविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सविता दुंगराम सोलंकी ही महिला तिच्या पतीसोबत अंधेरी येथे राहते. १२ जानेवारी ती तिच्या घरी होती. यावेळी तिच्याकडे एक व्यक्ती आला होता. त्याने डिश टिव्ही चालू आहे का, डिश टिव्ही फ्री वायफाय कनेक्ट करुन तो असे सांगितले. त्यानंतर त्याने वायरचा गंज काढण्याचा बहाणा करुन तिच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या घेऊन पलायन केले. हा प्रकार लक्षात येताच तिने अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती. या गुन्ह्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत सिंग दहिया, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले यांनी गंभीर दखल घेत अंधेरी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी घोरपडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमीत साटम, सुपे, पोलीस शिपाई सुरनर, कांबळे,जाधव, बाबर, टरके, नरबट, पाटील यांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर आरोपी हा घावत सहार रोडने रिक्षातून अंधेरी मेट्रो स्टेशन येथे आला होता. तेथून तो मेट्रोने घाटकोपर मेट्रो स्टेशनला उतरला. पुढे कॅमेरे नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता. तब्बल एक महिनाभर पोलिसांनी वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर आणि मेट्रो रेल्वेच्या सुमारे ४०० ते ५०० हून अधिक सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. या फुटेजवरुन आरोपी प्रथम गोवंडी येथून हार्बर लाईनवरुन वडाळा रोड येथे आला. नंतर माहीमला उतरुन मोरी रोड परिसरात त्याने अशाच प्रकारे काही गुन्हे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्याला यश आले नाही. त्यानंतर तो माहीम येथून विलेपार्ले येथे आला. रिक्षातून अंधेरी येथे आल्यानंतर तो सविता सोलंकी यांच्या घरी गेला होता. तेथून तो गोवंडी स्टेशनवरुन पळून गेला होता.
हाच धागा पकडून पोलीस निरीक्षक अमीत साटम यांच्यासह सुरनर, कांबळे,जाधव, बाबर, टरके, नरबट, पाटील यांनी गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मंसुर खान याला त्याच्या राहत्या घरातील गोवंडीतील मरियम्मा मंदिराजवळील रोड क्रमांक तीनच्या रुम क्रमांक आठमधून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी एक लॅपटॉप, बॅग आणि केबल वायर आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासात मंसुर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस विविध बतावणी करुन फसवणुकीसह चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुद्ध व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात दोन, जोगेश्वरी, आग्रीपाडा आणि भायखळा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्याच्या अटकेने अंधेरी, निर्मलनगर, मालाड, गोरेगाव पोलीस ठाण्याच्या प्रत्येकी दोन तर मुलुंड, घाटकोपर, साकिनाका, खैरवाडी, वांद्रे, दादर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा पंधरा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो वॉण्टेड होता. प्रत्येक वेळेस पोलिसांना गुुंगारा देऊन जात होता. अखेर त्याला पाच वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.