नामांकित बँकेच्या मॅनेजरची सायबर ठगाकडून फसवणुक
संचालकांच्या बोगस स्वाक्षरीसह लेटरहेडद्वारे गंडा घातला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – खाजगी कंपनीच्या संचालकाच्या बोगस स्वाक्षरी असलेल्या लेटरहेडवर पैसे ट्रान्स्फर करण्याची विनंती अर्ज करुन एका नामांकित बँकेच्या मॅनेजरची अज्ञात सायबर ठगाने सुमारे आठ लाखांची फसवणुक केल्याची घटना बीकेसी परिसरात घडली. याप्रकरणी बँक मॅनेजरच्या तक्रारीवरुन अज्ञात सायबर ठगाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. कंपनीच्या कर्मचार्याने ऑनलाईन व्यवहाराबाबत विचारणा केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
३९ वर्षांचे तक्रारदार मिरारोड येथे राहत असून एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. या बँकेची एक शाखा वांद्रे येथील बीकेसी परिसरात असून या शाखेत ते सध्या मॅनेजर म्हणून काम करतात. १३ मेला ते त्यांच्या बँकेत काम करत होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो गॅलेक्सी डायमंड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून अकाऊंटट बोलत असून तो त्यांच्या स्टाफ, संचालकासोबत एका कर्मचार्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी आले आहेत. कंपनीचे संचालक चिरागकुमार संघवी यांनी त्यांच्या मोबाईलवर एक विनंती अर्ज केला आहे. या अर्जावरील बँक खात्यात तातडीने आठ लाख रुपये ट्रान्स्फर करण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांच्या मोबाईलवर एक विनंती अर्ज केला होता. हा अर्ज कंपनीच्या अधिकृत लेटरहेडवर असल्याचे दिसून आले. त्यात अखिलेशकुमार यांच्या बँक खात्यात आठ लाख रुपये ट्रान्स्फर करण्याची विनंती करताना संचालक चिरागकुमार संघवी, मोनिका संघवी या संचालकाच्या स्वाक्षरी होत्या. ते लेटरहेड आणि स्वाक्षरी कंपनीच्या संचालकांची असल्याचे समजूत करुन त्यांनी संबंधित बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती.
तीन दिवसांनी कंपनीचा एक कर्मचारी बँकेत आला होता, त्याने आठ लाखांच्या व्यवहाराबाबत बँक मॅनेजरशी चर्चा केली असता त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. यावेळी या कर्मचार्यांनी कंपनीच्या संचालकांनी अशा प्रकारे कोणालाही लेटरहेडवर पैसे ट्रान्स्फर करण्याची विनंती केली नव्हती असे सांगितले. कंपनीचे संचालक महाबळेश्वर येथे गेले असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. अशा प्रकारे अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कंपनीच्या लेटरहेडसह संचालकाच्या स्वाक्षरीचा दुरुपयोग करुन ही फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच बँकेच्या वतीने मॅनेजरने बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.