मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जून २०२४
मुंबई, – सासर्याची देखभाल करण्यासाठी नोकरीवर ठेवलेल्या एका ५३ वर्षांच्या केअरटेकरने डॉक्टर महिलेच्या चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच यशवंत नावाच्या आरोपी केअरटेकरला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार महिला ही डॉक्टर असून ती तिच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहते. तिला एक चार वर्षांची मुलगी आहे. सासरे हे वयोवृद्ध असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी तिने यशवंत या ५३ वर्षांच्या व्यक्तीला केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. ५ जून ते १२ जून या कालावधीत घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने त्यांच्या चार वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार नंतर तिला तिच्या मुलीकडून समजला होता. ही माहिती ऐकल्यानंतर तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने मुलीसोबत कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपी केअरटेकरविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच यशवंतला पोलिसांनी विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरातून अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.