दुर्घटनाग्रस्त होर्डिंगची ४० लाखांची सुरक्षा ठेव भरली नाही
जान्हवी मराठेसह अन्य आरोपींच्या चौकशीतून खुलासा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जून २०२४
मुंबई, – गेल्या महिन्यांत वादळी पावसामुळे घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त होर्डिंगची सुमारे ४० लाख रुपयांची सुरक्षा ठेव इगो मिडीया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भरली नसल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. कंपनीच्या माजी संचालिका जान्हवी मराठे यांच्यासह इतर आरोपींच्या चौकशीतून ही बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.
मे महिन्यांत घाटकोपर येथील एक होर्डिंग कोसळून त्यात सतराजणांना आपला जीव गमवावा लागला होता. या गुन्ह्यांचा सध्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास सुरु आहे. याच गुन्ह्यांत इगो मिडीया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भावेश भिंडे, जान्हवी मराठे, स्ट्रक्टचरल ऑडिटर मनोज रामकृष्ण संधॅ आणि कॉन्ट्रक्टर सागर कुंभार अशा चौघांना पोलिसांनी अटक केली होती. जान्हवीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच चौकशीत कंपनीने होर्डिंगची बेकायदेशीरपणे परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात रेल्वेला ४०० टक्के अधिकचा महसूल मिळेल असे सांगण्यात आले होते. मोठमोठी आमिष दाखवून रेल्वेकडून ही परवानगी घेण्यात आली होती. मात्र परवानगी घेताना रेल्वेकडून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे उल्लघंन करण्यात आले होते. होर्डिंगसाठी सुमारे ४० लाखांची सुरक्षा ठेव भरणे आवश्यक होते, मात्र कंपनीने सुरक्षा ठेवीची ही रक्कम जमा केली नव्हती. या होर्डिंगबाबत मनपाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे मनपाने कंपनीला नोटीस बजावली होती. दोन वर्षांपासून होर्डिंग उभारण्याबाबत विनापरवानगी दंड आणि विलंब शुल्क म्हणून तेरा लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले, मात्र ही रक्कमही कंपनीने जमा केली नव्हती असे तपासात उघडकीस आले आहे.