बँक मॅनेजरच्या मदतीने व्यावसायिकाच्या बँक खात्यावर डल्ला
४२ लाखांच्या अपहारप्रकरणी बँक मॅनेजरला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ जून २०२४
मुंबई, – राजस्थानच्या जोधपूर शहरातील पाली शाखेच्या एका बँक मॅनेजरने आरोपीच्या मदतीने एका व्यावसायिकाच्या बँक खात्यावर सुमारे ४२ लाखांचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच येस बँकेच्या पाली शाखेचा मॅनेजर पवनशिव भगवान दादीच याला दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या कटातील मुख्य आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चगेट परिसरात राहतात. त्यांचा स्वतचा व्यवसाय असून त्यांच्या कंपनीचे येस बँकेत एक चालू खाते आहे. १६ मार्च २०२४ रोजी अज्ञात व्यक्तहीने इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्याचा ताबा घेतला होता. त्यांच्या संमतीशिवा त्यांच्या बँक खात्यातून ४१ लाख ८३ हजार ८५० रुपयांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ४१९, ४२०, १२० (ब) भादवी सहकलम ६६ (क), ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देसले व अन्य पोलीस पथक तपास करत होते. तपासात अज्ञात व्यक्तीने राजस्थानच्या जोधपपूर, पाली शाखेत तक्रारदारांचे मोबाईल क्रमांक, बोगस पॅनकार्ड, आधारकार्डसह इतर दस्तावेज केवायसीसाठी दिले. केवायसी अपडेट करुन त्याने त्यांच्या बँक खात्याचा ताबा घेतला होता. त्यानंतर त्यांच्या खात्यातून संपूर्ण रक्कम दुसर्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. हा संपूर्ण प्रकार येस बँकेच्या शाखेत जाऊन आरोपीने केला होता, त्यासाठी त्याला बँकेचे मॅनेजर पवनशीव दादीच याने मदत केली होती. तपासात ही माहिती उघडकीस येताच या पथकाने राजस्थान येथून पवनशीव दादीच याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी मुख्य आरोपीच्या बँक खात्याचे धनादेश जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर पवनशीव याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.