१.३८ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्लॉट गुंतवणुकीवर पाच गाळ्याचे आश्वासन देऊन गंडा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ जून २०२४
मुंबई, – रायगड परिसरातील एका प्लॉटवर गुंतवणुक केल्यास पाच व्यावसायिक गाळे देण्याची बतावणी करुन एका व्यावसायिकाची १ कोटी ३८ लाखांची फसवणुक झाली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. रोशन अली शहा आणि महादेव सीमा दुबरिया अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी गुंतवणुकीच्या नावाने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
गोकुळ गेला पांचपाया हे व्यवसायाने व्यावसायिक असून अंधेरीतील लोखंडवाला मार्केट, टिवीन सेंटरमध्ये राहतात. महादेव दुबरिया हा त्यांचा परिचित असून त्याचे अंधेरीतील लोखंडवाला मार्केट, सनशाईन इमारतीमध्ये आनंद होम आप्लांयसेस नावाचे एक कार्यालय होते. तीन वर्षांपूर्वी तिथेच त्यांची भेट झाली होती. यावेळी महादेवने त्याची स्वतची कंपनी असल्याचे सांगून रोशन शहा हा त्याचा भागीदार असल्याचे सांगितले होते. या कंपनीने रायगडच्या कामोठा सेक्टर दहा, प्लॉट क्रमांक तेरामध्ये एक मोकळा भूखंड खरेदी केला असून त्याची किंमत साडेसोळा कोटी इतकी आहे. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी त्यांना प्लॉटचे कागदपत्रे दाखविले होते. तिथे दोन इमारतीसह शॉपिंग सेंटर आहे. याच प्लॉटमध्ये त्यांनी गुंतवणुक केल्यास त्यांना सहा महिन्यांत पाच व्यावसायिक गाळे देण्याचे आश्वासन दिले होते. ही ऑफर चांगली वाटल्याने त्यांनी त्यांच्यासोबत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. जानेवारी ते जून २०२१ या कालावधीत त्यांनी त्यांना प्लॉट गुंतवणुकीसाठी १ कोटी ३८ लाख रुपये दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना पाच व्यावसायिक गाळे दिले नाही किंवा गुंतवणुक केलेली रक्कम परत केली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांत रोशन शहा आणि महादेव दुबारिया यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर दोन दिवसांपूर्वी त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.