मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जून २०२४
मुंबई, – प्रपोज केल्यांनतर तरुणीने नकार दिला म्हणून वाईट न वाटता तो त्याच्या रुटीन कामात व्यस्त झाला, मात्र त्याच तरुणीने याच कारणावरुन सतत टोमणे मारल्याने तो पेटवून उठला आणि त्याने सूड घेण्यासाठी तरुणीचा मॉर्फ फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी केली. याप्रकरणी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस धारावी पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना शिताफीने अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार तरुणी ही धारावी परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच परिसरात आरोपी हादेखील राहतो. एकाच परिसरात राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. अलीकडेच या तरुणीला सोशल मिडीयावर तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो दिसले होते. तिचे अश्लील फोटो तिच्या शिक्षकांना टॅग करण्यात आले होते. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. पालकांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिने धारावी पोलिसांना हा प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक संजय पुजारी, पोलीस उपनिरीक्षक सागर खाडे व अन्य पोलीस पथकाने तपास सुरुवात केली. यावेळी पोलिसांना एका सोशल अकाऊंटची माहिती समजली. ते अकाऊंट वसई येथे राहणार्या एका तरुणीचे होते, या तरुणीची चौकशी केली असता तिला एका व्यक्तीने फिल्मसिटीमध्ये काम देतो असे सांगून तिचा विश्वास संपादन केला होता. तिच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीवरुन त्याने सोशल मिडीयावर एक बोगस अकाऊंट उघडले होते. त्यानंतर त्याने तक्रारदार तरुणीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो अकाऊंटवरुन अपलोड करुन तिची बदनामी केली होती.
हाच धागा पकडून पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन आरोपी तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यानेच तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची कबुली दिली. ते दोघेही एकाच परिसरात राहत होते. त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते, त्यामुळे त्याने तिला प्रपोज केले होते. मात्र तिने त्याला नकार दिला होता. या घटनेनंतर ती त्याला कामासह इतर कारणावरुन टोमणे मारत होती. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. याच रागातून तिचा सूड घेण्यासाठी त्याने तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी केली होती. तपासात ही बाब उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.