विक्रीसाठी घेतलेल्या ३० लाखांच्या दागिन्यांचा अपहार
झव्हेरी बाजारातील घटना; व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जून २०२४
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे ३० लाखांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गणपतसिंह गुलाबसिंह सोलंकी या व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या व्यापार्याचा शोध सुरु केला आहे.
मनोहरसिंह अनारसिंह चौहाण हे ज्वेलर्स व्यापारी असून ते नालासोपारा येथील लिंक रोड, पंकिल अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा झव्हेरी बाजार येथील नास्ता गल्ली, डी डी प्लाझा परिसरात कृष्णा गोल्ड नावाचे एक दुकान आहे गणपतसिंह हा त्यांच्या परिचित व्यापारी असून अनेकदा त्यांनी त्याला क्रेडिटवर सोन्याचे दागिने विक्रीसाठी दिले होते. १० ऑगस्ट २०२३ रोजी त्यांनी त्याला ७९० ग्रॅम वजनाचे ४० लाख ६० हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने विक्रीसाठी दिले होते. त्यापैकी १७९ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचे सव्वानऊ लाखांचे पेमेंट त्याने दिले होते, मात्र उर्वरित ३० लाख ४७ हजार रुपयांचे पेमेंट त्याने दिलेल्या मुदतीत केले नव्हते. याबाबत वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. याच दरम्यान त्यांना गुलाबसिंह सोलंकी हा त्याचे दुकान बंद करुन पळून गेल्याचे समजले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुलाबसिंह सोलंकी याच्याविरुद्ध पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याने मार्केटमध्ये इतर काही व्यापार्याकडून सोन्याचे दागिने घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.