विदेशातून विविध टास्कच्या माध्यमातून अनेकांची फसवणुक
सायबर ठगांना बँक पुरविणार्या त्रिकुटास अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जून २०२४
मुंबई, – विदेशात बसून विविध टास्कच्या माध्यमातून अनेकांची फसवणुक करणार्या एका टोळीचा बांगुरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते तिघेही मूळचे गुजरातच्या अहमदाबाद व सुरत शहराचे रहिवाशी आहेत. उत्तम सखिया, रितेश वाघलिया आणि साहिल कछाडिया अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी विदेशातील सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचा आरोप असून अहमदाबाद आणि सुरत शहरातील काही बँकेत खाती उघडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याकामी त्यांना प्रत्येक कामासाठी एक लाखासह ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते.
यातील तक्रारदार गोरेगाव परिसरात राहतात. फेब्रुवारी महिन्यांना एका अज्ञात व्यक्तीने घरबसल्या पार्टटाईम जॉबची ऑफर दिली होती. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठविण्यात आली होती. त्यात जाहिरात पाहिल्यानंतर पैसे मिळतील असे सांगण्यात आले होते. ही ऑफर चांगली होती, त्यामुळे त्यांनी लिंकवरील जाहिरात लाईक करण्याचे टास्क पूर्ण केले. प्रत्येक जाहिरातीमागे त्यांना १२० रुपये मिळत होते. सुरुवातीच्या फ्री टास्कनंतर त्यांना प्रिपेड टास्क देण्यात आले होते. त्यात त्यांना काही रक्कम आधी गुंतवणुक करावी लागणार होती, या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळेल असे सांगून या ठगांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांनी विविध टास्कसाठी ५ लाख ६२ हजाराची गुंतवणुक केली होती. यावेळी त्यांना चांगला परतावा मिळत असल्याचे दिसून आले. मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. याबाबत वारंवार विचारणा करुनही त्यांना समोरुन प्रतिसाद मिळत नव्हता. फसवुणकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी गुजरातच्या अहमदाबाद आणि सुरत शहरातून उत्तम सखिया, रितेश वाघलिया आणि साहिल कछाडिया या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिन्ही आरोपी पदवीधर असून झटपट पैसे कमविण्यासाठी त्यांनी विदेशातून टास्कच्या नावाने गंडा घालणार्या सायबर ठगांना विविध बँकेत खाती उघडून दिले होते. त्याच्या मोबदल्यात त्यांना एक लाख रुपये आणि ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. त्यांनी उघडलेल्या बँक खात्यात फसवणुकीची ही रक्कम जमा होत होती. ही रक्कम एटीएममधून काढल्यानंतर संबंधित सायबर ठगांना पाठविली जात होती. या कटातील मुख्य आरोपी कंबोडियातून फसवणुकीचे टास्क देत असल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आले होते. फसवणुकीसह आयटीच्या गुन्ह्यांत अटक केल्यांनतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने ऑनलाईन फसवणुकीचे इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.