हॉस्पिटलमध्ये लॅपटॉप चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार गजाआड

तेरा गुन्ह्यांची नोंद तर पाच गुन्ह्यांची उकल; ११ मोबाईल जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – हॉस्पिटलमध्ये प्रवेश करुन लॅपटॉप चोरी करुन पळून जाणार्‍या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पुण्यातून गजाआड करण्यात भोईवाडा पोलिसांना यश आले आहे. विकास संजय हगवणे असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात तेराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडू चोरीचे अकराहून अधिक लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याची किंमत पाच लाख दहा हजार इतकी आहे. लवकरच विकास हगवणे याचा ताबा इतर पोलिसांना देण्यात येणार आहे.

दिव्या कांबळे या डॉक्टर असून त्या परळच्या टाटा हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. ८ एप्रिलला दुपारी त्या होमी भाभा इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर काम करत होत्या. ओपीडी रुममध्ये लॅपटॉप काम करताना त्यांना कामानिमित्त अकराव्या मजल्यावर जावे लागले होते. यावेळी त्यांनी त्यांचा लॅपटॉप टेबलवर ठेवला होता. ही संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्यांचा लॅपटॉप चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलमधून लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे त्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक पंकज धाडगे, पोलीस उपनिरीक्षक अमीत कदम, सूर्यकांत म्हेत्रे, पोलीस हवालदार साळुंखे, कोचरेकर, पोलीस शिपाई घस्ते, बिडवे, तडवी, रणधीर, डाईंगडे, सुळे यांनी तपास सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेजसह मिळालेल्या माहितीवरुन पोलीस पथक पुण्यात गेले आणि त्यांनी विकास हगवणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तो पुण्याच्या हवेली, वाघोलीच्या वाघेश्‍वर मंदिराजवळील वाघेश्‍वर सोसायटीचा रहिवाशी आहे. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली.

तपासात विकास हा हॉस्पिटलमध्ये चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध भोईवाडा, गावदेवी, विनोबा भावे नगर, ठाण्याच्या वर्तकनगर, नवी मुंबईच्या वाशी पोलीस ठाण्यासह पुण्यातील विविध सात तर सुरतच्या सरथाना पोलीस ठाण्यात एक अशा तेराहून अधिक चोरीसह जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे अकरा लॅपटॉप जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला भोईवाडा येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या पोलिसांकडून लवकरच त्याचा ताबा घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page