रणजी ट्रॉफीमध्ये निवड करण्याच्या आमिषाने सहा तरुणांची फसवणुक

६३ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोन भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) – रणजी ट्रॉफीमध्ये गेस्ट प्लेअर आणि नंतर लोकल प्लेअर म्हणून खेळविण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीच्या सहा खेळाडू तरुणांची सुमारे ६३ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पैशांचा अपहार करुन तरुणांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन भामट्याविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. प्रशांत वसंत कांबळे आणि देवेश उपाध्याय अशी या दोघांची नावे असून यातील प्रशांत कांबळे हा कटातील मुख्य आरोपी आहे तर देवेशने तो सिनेअभिनेता सोनू सूदचा सहाय्यक असल्याची बतावणी केली होती. या सहाही खेळाडूंना बिहार, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम क्रिकेट असोशिएशनचे बोगस नियुक्तीचे पत्र देण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

संतोष रावसाहेब चव्हाण हे मूळचे रत्नागिरीच्या चिपळूण, खेर्डीचे रहिवाशी आहेत. त्यांचा स्वतचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय असून ते भाजपाचे जिल्हा सहचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीकडून राजकीय पार्ट्या, लग्नाचे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले जाते. गेल्या पंधरा वर्षांपासून ते स्वत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करतात. याच कार्यक्रमांदरम्यान त्यांची प्रशांत कांबळे याच्याशी रत्नागिरीमध्ये ओळख झाली होती. ते दोघेही रत्नागिरी संघाकडून क्रिकेट खेळले होते. नंतर प्रशांतची मुंबई संघाकडून अंडर २३ मध्ये निवड झाली होती. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री होती. याच दरम्यान त्याने त्यांची ओळख देवेशशी करुन दिली होती. देवेश हा सिनेअभिनेता सोनू सूदकडे सहाय्यक म्हणून काम करतो असे सांगितले होते. काही महिन्यानंतर त्याने त्यांना त्याचे बीसीसीआयमधील काही वरिष्ठ अधिकार्‍यांशी चांगले असून त्यांच्या परिचित चांगल्या खेळांडूना रणजी ट्रॉफीमध्ये संधी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या परिचित सहा तरुणांची निवड केली होती. या तरुणांना रणजी ट्रॉफीमध्ये संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करतील असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी प्रशांतकडे या सहाजणांची शिफारस केली होती. त्यांचा खेळ प्रशांतने पाहिला होता, तो त्यांच्या परिचित होता. त्यामुळे त्याने त्यांना गोरेगाव येथे नेट प्रॅक्ट्रीससाठी बोलाविले होते. त्यांच्याविषयी सविस्तर चर्चा करुन त्याने संतोष चव्हाण यांच्याकडून त्यांची माहितीसह इतर कागदपत्रे घेतली होती.

या तरुणांना रणजी ट्रॉफीमध्ये गेस्ट प्लेअर म्हणून खेळण्याची संधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी काही खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून २०१८ ते २०२२ या कालावधीत या सहाजणांनी प्रशांत आणि देवेशच्या बँक खात्यात सुमारे ४८ लाख ७० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. याच दरम्यान प्रशांतने त्यांना करार करण्यासाठी मालाड येथील चिंचोली बंदर रोड, सुंदरनगरच्या अशोक इन्कलेव्हमध्ये बोलाविले होते. यावेळी त्यांच्यासोबत संबंधित सहाही तरुण उपस्थित होते. तिथे प्रशांत आणि देवेशने त्यांच्यासोबत एक करार केला होता. यावेळी त्यांच्याकडून कॅश स्वरुपात काही रक्कम घेण्यात आली होती. त्यानंतर त्यांना नागालँड, मिझोरम, मणिपूर, बिहार किक्रेट असोशिएशनचे लेटरहेडवर सिलेक्शन लेटर दिले होते. ऑक्टोंबर २०१८ रोजी या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात झाली होती. २०२२ पर्यंत याबाबत सविस्तर चर्चा आणि पैशांची देवाणघेवाण सुरु होती. त्यानंतर त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते. मात्र त्यांना प्रत्यक्षात नियुक्ती झाल्याबाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती. बीसीसीआयच्या नवीन नियमावलीनुसार जे गेस्ट प्लेअर म्हणून खेळविण्यात येणार होते, त्यांना आता लोकल प्लेअर म्हणून खेळावे लागणार होते. त्यामुळे या सहाही तरुणांचे नव्याने करार करण्यात आला होता. काही दिवसांनी त्यांना नागालँड, मणिपुर, बिहार आणि मिझोरम राज्यात पाठविण्यात आले, मात्र सात दिवसांनी त्यांना पुन्हा बोलविण्यात आले होते. त्यानंतर संतोष चव्हाण यांच्यासह संबंधित सहाजणांनी प्रशांत आणि देवेशची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी रणजी ट्रॉफी न खेळण्याचा निर्णय घेत त्यासाठी दिलेले सुमारे ६३ लाख रुपये परत करण्याची विनंती केली होती. त्यासाठी संतोष चव्हाण हे स्वत प्रयत्न करत होते. मात्र या दोघांनी त्यांना पैसे परत केले नाही. त्यांनी पैसे पाठविल्याच्या स्लिप तसेच विविध राज्याच्या क्रिकेट असोशिएशनचे दिलेले नियुक्तीचे पत्र बोगस असल्याचे उघडकीस आले.

अशा प्रकारे या दोघांनी रणजी ट्रॉफीमध्ये गेस्ट प्लेअर आणि नंतर लोकल प्लेअर म्हणून क्रिकेट संघात सामावून घेण्याची बतावणी करुन संतोष चव्हाण यांनी शिफारस केलेल्या सहा तरुणांकडून सुमारे ६३ लाख रुपये घेऊन या पैशांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रशांत कांबळे आणि देवेश उपाध्याय यांच्याविरुदध पोलिसांनी ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोन्ही आरोपींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page