बिल्डरची कर्मचारी इंजिनिअरकडून तीस लाखांची फसवणुक
बँक खात्याचा पासवर्ड-युझर आयडीचा गैरवापर करुन अपहार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ जून २०२४
मुंबई, – वांद्रे येथील एका बिल्डरची त्याच्याच कंपनीतील इंजिनिअरने सुमारे तीस लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँक खात्याचा युझर आयडी-पासवर्डचा गैरवापर करुन मोबाईलवर ओटीपी क्रमांक प्राप्त करुन ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी इंजिनिअर आफ्ताब अहमद भुलई शेख याच्याविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
जयचंद लालमन निसार हे व्यवसायाने बिल्डर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथील महाराष्ट्रनगर, टायटानिक अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा नितीन आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून एमआयजी क्लबसमोरील गांधीनगर परिसरात कंपनीचे एक कार्यालय आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याकडे आफ्ताब हा इंजिनिअर म्हणून काम करतो. त्यांची अकाऊंटट रजेवर गेल्यामुळे त्यांनी त्याच्यावर कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी सोपविली होती. एक वर्षांपूर्वी त्यांच्या आईच्या मालकीचा एक फ्लॅट आफ्तबाने शैलेश गुप्ता नावाच्या व्यक्तीला २३ लाखांना विक्री केला होता. त्यानंतर त्यांच्यात एक करारनामा झाला होता. त्यापैकी पाच लाख रुपये शैलेशने दिले होते, उर्वरित रक्कम एका वर्षांत देण्याचे ठरले होते. १६ जूनला शैलेश हा त्यांच्या कार्यालयात आला आणि त्याने फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. काही वेळानंतर कार्यालयात आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी आफ्ताबला घेऊन गेले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी खेरवाडी पोलिसांत तक्रार केली होती.
याच दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून ३० लाख रुपये एका बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. यावेळी आफ्ताबने त्यांच्या बँक खात्यातून एनईएफटीद्वारे ही रक्कम ट्रान्स्फर केल्याचे उघडकीस आले. त्याने त्यांच्या बँकींग पासवर्ड युझर आयडीचा गैरवापर करुन ओटीपी क्रमांक प्राप्त करुन तीस लाखांच्या रक्कमेचा अपहार केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आफ्ताबविरुद्ध खेरवाडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यातील व्यवहार थांबविण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे.