अश्लील स्पर्श करुन २० वर्षांच्या कॉलेज तरुणीचा विनयभंग
मालाड रेल्वे स्थानकातील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – चर्चगेटकडे जाणार्या उपनगरीय लोकलमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन एका २० वर्षांच्या कॉलेज तरुणीला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार मालाड रेल्वे स्थानकात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.
तक्रारदार तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत ही मालाड परिसरात राहत असून सध्या कॉलेजमध्ये शिकते. १५ फेब्रुवारीला सकाळी पावणेनऊ वाजता ती चर्चगेटला जाण्यासाठी मालाड रेल्वे स्थानकात आली होती. सकाळची वेळ असल्याने लोकलला प्रचंड गर्दी होती, त्यामुळे तिने अपंगाच्या डब्ब्यातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी अपंगच्या डब्ब्यात चढत असताना एका अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन तिच्याशी अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. यावेळी तिने मागून त्याला जोरात फटका मारला होता. या घटनेनंतर ती चर्चगेटला गेली. तेथून घरी गेल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ती दुसर्या दिवशी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात आली होती.
यावेळी तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची अनिल कदम यांनी गंभीर दखल घेत महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री मुलगीर यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गुन्हा घडल्यानंतर तब्बल ३६ तासानंतर तक्रारदार तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच रेल्वे पोलिसांनी मालाड रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे. लवकरच या आरोपीला अटक केली जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.