पोलीस हवालदाराच्या घरी चोरट्याची हातसफाई
बंद घरात प्रवेश करुन दागिने आणि कॅश पळविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जून २०२४
मुंबई, – पोलीस हवालदाराच्या गोरेगाव येथील आई-वडिलांच्या घरी अज्ञात चोरट्यानी हातसफाई केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील कुलूप तोडून या चोरट्याने सोन्याचे दागिने आणि कॅश असा एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु केला आहे.
अभय दत्ताराम जाधव हे मालाड येथील उंदेराई रोड, श्रीनाथ टॉवर कंपाऊंडच्या पार्शी चाळीत त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत असून ते मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आई-वडिल भाऊ, त्याची पत्नी गोरेगाव येथील मोतीलाल नगर क्रमांक तीनमध्ये राहतात. त्यांच्या रत्नागिरीतील दापोली गावात ग्रामदेवतेचे उत्सव असल्याने त्यांचे आई-वडिल दरवर्षी गावी जातात. २२ एप्रिलला ते त्यांच्या गावी गेले होते. यावेळी त्यांच्या घराची चावी अभय जाधव यांच्याकडे होती. ते अधूनमधून जाऊन घराकडे लक्ष ठेवून होते. ७ जूनला ते त्यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांचा भावाला वडिलांच्या औषधांची लिस्ट दिली होती. ८ जूनला त्यांच्या भावाने त्यांना फोन करुन त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे सांगितले. घरातील कुलूप तुटलेले असून त्यांच्या शेजारी राहणार्या स्वामी यांनी ती माहिती त्यांना दिली होती. त्यामुळे ते तिथे गेले होते. यावेळी त्यांना घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. कपाटातील सोन्याचे दागिने आणि पंधरा हजाराची कॅश असा एक लाख तीस हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळविल होता.
घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करुन ही घरफोडी झाली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गोरेगव पोलीस ठाण्यात त्यांच्या आई-वडिलांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.