मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जून २०२४
मुंबई, – चेन्नई-मुंबई इंडिगो विमानात बॉम्ब असल्याच्या मॅसेजमुळे एकच खळबळ उडाली होती. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर विमानाची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे प्रवाशांसह इंडिगोच्या कर्मचार्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहे. हा मॅसेज कोणी आणि कोठून पाठविण्यात आला होता याचा शोध सुरु आहे.
मंगळवारी चेन्नईहून मुंबईला जाणार्या इंडिगा विमानात बॉम्ब असल्याचा एक मॅसेज आला होता. दिल्ली मुख्यालयातील इंडिगोच्या चॅट बॉक्समध्ये हा मॅसेज आल्यानंतर व्यवस्थापक तेजल यांनी ही माहिती मुंबई एअरपोर्ट अधिकार्यांना दिली होती. यावेळी विमानातील संबंधित कर्मचार्यासह विमानतळाला हाय अलर्टवर ठेवण्यातअ आले होते. मुंबईत आलेल्या इंडिगोच्या विमानाला नंतर सुरक्षित स्थळी नेण्यात आले. सर्व प्रवाशांना खाली उतरविल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण विमानाची तपासणी सुरु केली होती. मात्र विमानात काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता इंडिगोचे एक विमान चेन्नईहून मुंबईच्या दिशेने निघाले होते, त्याच वेळेस हा मॅसेज आल्याने तिथे उपस्थित अधिकार्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.