मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० जून २०२४
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन वादातून अक्षय जालिंदर तिकडे या २९ वर्षांच्या तरुणांची दहाजणांच्या टोळीने तलवार, कोयता आणि चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना ट्रॉम्बे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून दहापैकी सहा आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली आहे. रविंद्र राजू दास, अभिजीत शशिकांत ओव्हाळ, पियुष रमेश जाधव ऊर्फ लाल्या, प्रणेश प्रमोद नायडू ऊर्फ सिद्धू, आकाश तुकाराम मांडवकर आणि शशिकांत पतीराम यादव अशी या सहाजणांची नावे आहेत. यातील आकाश आणि शशिकांत हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांत चौघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी रात्री उशिरा सव्वाबारा वाजता मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, गावडे चाळ मैदानात घडली. अमोल जालिंदर तिकडे हा नवी मुंबईतील कौपरखैरणे, सेक्टर पाचमध्ये राहतो. अक्षय हा त्याच लहान भाऊ तो पाणी सल्पाय करण्याचे काम करतो. काही दिवसांपूर्वीच त्याला मानखुर्द येथील नियोजित मेट्रो प्रकल्पाचे पाणी पुरवठा करण्याचे एक कॉन्ट्रक्ट मिळाले होते. मंगळवारी कामावरुन तो ट्रॉम्बे येथील महाराष्ट्रनगरात त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी आला होता. मित्राशी गप्पा मारत असताना तिथे त्याच्याच परिचित दहा आरोपी आले. त्यांच्यात झालेल्या क्षुल्लक वादातून त्यांनी त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. या वादानंतर या टोळीने त्याच्यावर तलवार, कोयता आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या डोक्याला, मानेला, पोटाला आणि छातीला गंभीर दुखापत झाला होता. हल्ल्यानंतर ते सर्वजण तेथून पळून गेले होते. रक्तबंबाळ झालेल्या अक्षयला त्याच्या मित्रांनी तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये तिकडे कुटुंबिय आले होते.
अक्षयच्या मित्रांकडून त्यांच्यासह पोलिसांना घडलेला प्रकार समजला. त्यानंतर अमोल तिकडे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध ३०२, १४३, १४७, १४८, १४९ भादवी सहकलम ४, २५ घातक शस्त्र अधिनियम सहकलम ३७ (१), (अ), १३५ मुंबई पोलीस कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सहा आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यांचे इतर चार सहकारी पळून गेले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर या सहाजणांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.