उत्तरप्रदेशातून अटक केलेल्या ३२ वर्षांच्या आरोपीचे पलायन

मुंबई विमानतळावरील घटना; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० जून २०२४
मुंबई, – उत्तरप्रदेशातून अटक केलेल्या एका आरोपीने गोवा पोलिसांवर हल्ला करुन पलायन केल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. इमाद वसीम खान असे या ३२ वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध सहार पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेसाठी सहार पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सुशांत प्रकाश नाईक चोपडेकर हे मूळचे गोव्याचे रहिवाशी आहेत. सध्या ते गोवा पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून त्यांची पोस्टिंग मापसा पोलीस ठाण्यात आहे. काही दिवसांपूर्वी मापसा पोलीस ठाण्यात इमाद खान या आरोपीविरुद्ध ३४२, १७०, ५०६, ३८९, ३४ भादवी कलमांतर्गत एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्याचा शोध सुरु असताना इमाद हा उत्तरप्रदेशातील त्याच्या गावी लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक बाबलो परब, सुशांत चोपडेकर, प्रकाश पाळेकर आदीचे एक पथक उत्तरप्रदेशात गेले होते. या पथकाने सहारानपूर पोलिसांच्या मदतीने इमादला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. १९ जूनला पोलीस पथक इमादला घेऊन उत्तरप्रदेशातून दिल्ली आणि मुंबईमार्गे गोव्याला जाण्यासाठी इंडिगो विमानाने निघाले होते. उत्तरप्रदेशातून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला घेऊन पोलीस जात होते. यावेळी इमादने पोलिसांना धक्काबुक्की करुन मारहाण केली आणि त्यांच्या तावडीतून पळ काढला होता. यावेळी कारमधून लपून बसलेल्या इमादला पोलिसांनी पकडले, मात्र त्याने पुन्हा पोलिसांवर हल्ला केला होता. त्यानंतर तो पळून गेला होता. त्याचा पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. तो पळून गेल्याची खात्री होताच सुशांत चोपडेकर यांनी सहार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून इमादविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पोलीस पथकाला मारहाण करुन कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा सहार पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page