गिरगाव, ग्रॅटरोड व गावदेवी येथून चार बांगलादेशी महिलांना अटक

दोन महिलांना पंधरा व सात वर्षांपासून वास्तव्यास असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० जून २०२४
मुंबई, – गिरगाव, ग्रॅटरोड आणि गावदेवी परिसरात वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना एका विशेष मोहीमेतर्गत स्थानिक पोलिसांनी अटक केली. बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून या महिलांना भारतात पळून आल्या होत्या. त्यापैकी दोन महिला गेल्या पंधरा आणि सात वर्षांपासून मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. अटकेनंतर या चौघींनाही गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या चारही महिलांना बांगलादेशात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेशच वरिष्ठांना झोनच्या सर्वच पोलीस ठाण्यांना दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे, व्ही. पी रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरकुमार शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार धुमाळ, एटीसी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज शेवाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डेरे, पोलीस हवालदार चव्हाण, पाटील, पोलीस शिपाई कापसे, नगारजी, एल. टी मार्ग पोलीस ठाण्याचे एटीसी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पचलोरे, पायधुनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय ननवरे, गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत उगले, व्ही. पी रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुरदरे व अन्य पोलीस पथकाने मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच डी. बी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाई दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. माजिदा गुलाम जिक्रिया शेख आणि नूरजहॉं बेगम सुल्तान मुल्ला अशी या दोघांची नावे आहेत. यातील नूरजहॉं ही बोटीमार्गे बांगलादेशातून कोलकाता आणि नंतर मुंबईत आली होती. गेल्या सात वर्षांपासून ती मुंबई शहरात वास्तव्यास होती. माजिदा ही गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असून तिला एका बांगलादेशी मित्राने भारतात पाठविले होते. त्यासाठी तिने मित्राला काही रक्कम कमिशन म्हणून दिली होती. गेल्या काही वर्षांपासून गिरगाव परिसरात राहत होती.

अशाच अन्य दोन कारवाईत गावदेवी आणि व्ही. पी रोड पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्या दोघीही बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून बांगलादेशातून भारतात पळून आल्या होत्या. काही महिने कोलकाता येथे राहिल्यानंतर त्या दोघीही नोकरीसाठी मुंबईत आल्या होत्या. तेव्हापासून त्या दोघीही मुंबईत अनधिकृतपणे राहत होत्या. अटकेनंतर या चौघींनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून त्यांच्या परिचित इतर कोणी बांगलादेशी मुंबईत राहत आहे का याची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सागितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page