पार्टी मागितली म्हणून १९ वर्षांच्या तरुणावर प्राणघातक हल्ला
मानखुर्द येथील घटना; तिन्ही मारेकर्यांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जून २०२४
मुंबई, – पार्टी मागितली म्हणून एका १९ वर्षांच्या तरुणावर तिघांनी चॉपर आणि चाकूने प्राणघातक हल्लाकेला. या हल्ल्यात आसिफ आलम शेख हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी तिन्ही मारेकर्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. योगेश सुभाष बल्लाळ, आकाश हरिशंकर जैस्वार आणि साहिल अनंत सुर्वे अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, शिवशक्ती चाळ, विश्वकर्मा मंदिरासमोरील रस्त्यावर घडली. आरिफा आलम शेख ही तरुणी चेंबूरच्या वाशीनाका, माहुल म्हाडा परिसरात राहत असून जखमी झालेला आसिफ हा तिचा लहान भाऊ आहे. याच परिसरात तिन्ही आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. दोन दिवसांपूर्वी साहिलचा वाढदिवस होता. त्यामुळे आसिफने त्याच्याकडे पार्टी मागितली होती. त्याचा राग आल्याने योगेशने त्याला आईवरुन शिवीगाळ केली होती. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी योगेशसह इतर दोघांनी आसिफला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चॉपर आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याच्या चेहर्याला, डोक्याला, हाताला, पाठीला, मांडीला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर ते तिघेही तेथून पळून गेले होते. जखमी झालेल्या आसिफला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. हॉस्पिटलमधून ही माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आरिफा शेख हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या तक्रारीनंतर तिन्ही मारेकर्याविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी ३०७, ३२६, ३५२, ५०४, ३४ भादवी सहकलम ३७ (१), (अ), १३५ मुंबई पोलीस कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या योगेश, आकश आणि साहिल या तिघांनाही मानखुर्द येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.
गोवंडी येथे तरुणीवर हल्ला करणारा गजाआड
अन्य एका घटनेत गोवंडी येथे आफरीन बिमो सुलेमान शेख या तरुणीवर हल्ला करणार्या राकेश ऊर्फ कुमार धनराज धोंडे या आरोपीस शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी १७ जूनला गोवंडीतील बैंगणवाडी, रोड क्रमांक तेरा, तामिरे मिल्लत मशिदीजवळ घडली. आफरीन ही तिच्या आईसोबत गोवंडी परिसरात राहते. तिची आई एका गुन्ह्यांत मुख्य साक्षीदार असून याच गुन्ह्यांत राकेश हा आरोपी आहे. सोमवारी ती तिच्या आईसोबत गप्पा मारत होती. यावेळी तिथे राकेश आला आणि त्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात तिला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर त्याने तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला होता. जखमी आफरीनवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे. बुधवारी १९ जूनला तिने हा प्रकार शिवाजीनगर पोलिसांना सांगितला. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी राकेश धोंडेविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.